0


पंढरपूर / शहर प्रतिनिधी
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील अटीतटीच्या लढतीत आ.भारत भालके यांनी बाजी मारत दुसर्‍यांदा विजय मिळविला असला तरी पहिल्यांदाच निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेले प्रशांत परिचारक निवडणूक खर्चात आघाडीवर राहिल्याचे समोर आले आहे. समाधान आवताडे आणि चंद्रकांत बागल खर्चातही अनुक्रमे तिसर्‍या व चौथ्या क्रमांकावर राहिले आहेत. एकूण २0 पैकी १७ उमेदवारांचा खर्च ८७ लाख ७७ हजार १६३ रूपये झाला असून आणखी तिघांनी खर्च सादर केलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशा भाजपाच्या मातब्बर नेत्यांच्या प्रचारसभांमुळे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील लढत राज्यभर गाजली होती. गतवेळी रिडालोस अंतर्गत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उमेदवारीवर कपबशी हे चिन्ह घेऊन निवडणूक लढवित विजयश्री खेचून आणणारे आ.भारत भालके यावेळच्या निवडणुकीत काँग्रेसचा पंजा घेऊन लढले. त्यांचे प्रतिस्पर्धी जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष प्रशांत परिचारक यांनी मात्र उमेदवारीसाठी मोठय़ा पक्षांपेक्षा भाजपा-महायुतीचा घटकपक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पसंदी देत कपबशी चिन्ह घेतले. या दोघांपुढेही शिवसेनेचे धनुष्य हाती घेत समाधान आवताडे यांनी कडवे आव्हान उभे करण्याचा प्रय▪केला, तर राष्ट्रवादीने उद्योजक चंद्रकांत बागल यांच्याकडे घड्याळाची जबाबदारी सोपवली. अतिशय अटीतटीच्या लढतीत अखेर आ.भालके यांनीच बाजी मारली. परिचारक दुसर्‍या क्रमांकावर राहिले. निवडणूक आयोगाकडे अंतिम खर्च सादर केल्यानंतर या खर्चात मात्र परिचारक पहिल्या, तर आ.भालके दुसर्‍या स्थानावर राहिल्याचे दिसून आले आहे. सादर केलेल्या निवडणूक खर्चानुसार परिचारक यांचा खर्च २१ लाख ९८ हजार ४९0 रूपये, तर आ.भालके यांचा खर्च १८ लाख ९२ हजार २९६ रूपये झाला आहे. शिवसेनेचे आवताडे मतांबरोबरच खर्चातही तिसर्‍या क्रमांकावर राहिले आहेत. त्यांचा खर्च १५ लाख ४४ हजार ६७७ रूपये झाला आहे. राष्ट्रवादीचे चंद्रकांत बागल हे खर्चातही चौथ्या क्रमांकावर राहिले असून त्यांचा खर्च १३ लाख ७५ हजार ८५ रूपये झाल्याचे नमुद करण्यात आले आहे. या मतदारसंघात एकूण २0 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यापैकी १७ जणांनी आपला निवडणूक खर्च आयोगाकडे सादर केला आहे. या सर्वांचा खर्च ८७ लाख ७७ हजार १६३ रूपये झाल्याचे नमुद करण्यात आले आहे. 'स्वाभिमानी'चे बंडखोर जयवंत बगाडे, मनसेचे उमेदवार जयवंत माने व अपक्ष परमेश्‍वर वाघमोडे या तिघांनी अद्याप आपला खर्च सादर केलेला नाही.
उमेदवारांचा निवडणूक खर्च
आ.भारत भालके- १८ लाख ९२ हजार २९६ रूपये, प्रशांत परिचारक- २१ लाख ९८ हजार ४९0 रूपये, समाधान आवताडे- १५ लाख ४४ हजार ६७७ रूपये, चंद्रकांत बागल- १३ लाख ७५ हजार ८५ रूपये, भजनदास पवार- २७ हजार ४00 रूपये, दत्तात्रय खडतरे- ३ लाख ३५ हजार ८६५ रूपये, रत्नप्रभा पाटील- ३ लाख ८५ हजार ५१९ रूपये, शिवलाल लोकरे- ४२ हजार ३५५ रूपये, अँड़नंदकुमार पवार- ७ लाख २९ हजार ७१५ रूपये, रविप्रकाश- ३५ हजार ३५0 रूपये, श्रीकांत डांगे- १0 हजार ८३५ रूपये, शांतीनाथ बागल- १५ हजार ६३६ रूपये, विलास सरवळे- १0 हजार ५८८ रूपये, किशोर जाधव- १३ हजार ७५0 रूपये, अनिल पाटील- ६ हजार २१0 रूपये, नदाफ सिकंदर जब्बारअली- ७0 हजार ९२ रूपये, सीताराम सोनवले- ६८ हजार ३00 रूपये. १७ उमेदवारांचा खर्च ८७ लाखांवर; तिघांचा खर्च येणे बाकी

Post a Comment

 
Top