0

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मोहोळमधून पक्षाने उमेदवारी नाकारल्यामुळे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री प्रा.लक्ष्मण ढोबळे यांनी बंडाचे निशाण फडकविले. मात्र, बंडखोरीमुळे आजवरच्या त्यांच्या पक्षनिष्ठेवर पाणी फेरले. त्यांना मिळालेली मते हा तर मतदारसंघात हस्याचा विषय ठरला असून सर, हात दाखवून अवलक्षण कशासाठी केलात, असा सवाल जाणकारांमधून व्यक्त होत आहे पाच वर्षांपूर्वी त्यांचा हक्काचा मंगळवेढा मतदारसंघ गोठविल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रा.ढोबळे यांची मोहोळमधून आमदारकी निश्‍चित केली. मोहोळचे माजी आमदार राजन पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मनोहर डोंगरे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बळीरामकाका साठे यांनी त्यांच्या विजयासाठी अथक परिश्रम घेतले. त्यात ते विक्रमी मताधिक्याने निवडूनही आले. शरद निष्ठेचे फळ म्हणून त्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले. खा.पवार यांचा लाडका कार्यकर्ता म्हणून सार्‍या महाराष्ट्रात प्रा. ढोबळे यांची ओळख आहे. पक्षाने थांबण्याचा आदेश दिल्यानंतर प्रा.ढोबळे हे महाराष्ट्राभर स्टार प्रचारक म्हणून पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराची धुरा सांभळतील, असेच प्रत्येकाला वाटत होते. मात्र, आमदार होण्याच्या अट्टहासासाठी सरांनी बंडाचा झेंडा हाती घेतला. राष्ट्रवादीचा कोणीतरी नेता साथ देईल, अशीच भाबडी आशा त्यांना होती. पण, हायकमांडचा आदेश असल्यामुळे पाटील,डोंगरे, साठे या तिनही नेत्यांनी तसा मतदारसंघाशी एक आजोळ यापलिकडे कोणताच दुरान्वये संबंध नसताना देखील रमेश कदम यांच्या विजयासाठी जीवाचे रान केले. मुळातच प्रा. ढोबळे सरांची खा.शरद पवार यांच्यावरील नितांत निष्ठा पाहता त्यांनी बंडखोरी केलीच कशी, हाच प्रश्न प्रत्येकाला पडला. पाच वर्षांपूर्वी जे ढोबळे सर मोहोळ तालुक्याचे मालक म्हणून पाटील, डोंगरे या नेत्यांचा वारंवार उल्लेख करायचे. खरे आमदार हेच आहेत. मी तुमचा सालगडी आहे, असेही ते जाहीर सभांमधून म्हणायचे. त्याच सरांनी या दोन्ही नेत्यांच्या विरोधात टिकेची राळ उठविली. सारेच पक्ष स्वत:ची ताकद अजमवित असल्यामुळे कदाचित मतदार आपल्यालाच स्विकारतील, असे वाटल्यामुळेच सरांनी बंडखोरी केली असावी, असाही कयास निघत आहे. पण, जे ढोबळे सर खा.पवारांचा एक शब्दही ओलांडत नाहीत, त्यांनी बंडखोरीचे केलेले धाडस म्हणजे बोलविता धनी पवार साहेबच असतील, असाही एक विचार व्यक्त होत होता. पण, जर खा.पवारांनी तशी संमती दिली असती तर ज्यांनी ५0 वर्षांहून अधिक काळ शरद निष्ठेत व्यथित केला, ते साठे तरी ढोबळे सरांच्या मागे उभे राहिले असते, असाही तर्क लढविण्यात आला. मुळातच सरांनी बंडखोरीच्या फांद्यात न पडता पक्ष अडचणीत आला आहे, तेव्हा महाराष्ट्राभर प्रचाराची धुरा सांभाळली असती तर त्याची श्रेष्ठींनी दखल घेतली असती. पण, बंडखोरी करुन हात दाखवून अवलक्षण कशासाठी केले, हे मात्र, न उलगडणारे कोडेच म्हणावे लागेल.

Post a Comment

 
Top