(ढिंग टांग)
आदरणीय महामॅडम यांच्या चरणी बालके बाबाजीचा शिर्साष्टांग दंडवत विनंती विशेष. फारा दिवसांत दिल्लीस येणे झाले नाही. (आता कैसे येणे जाणे..!) म्हणून हा पत्रप्रपंच. गेल्या काही दिवसांत मी इतक्या स्थित्यंतरांमधून गेलो आहे, की समोर उभा राहिलो तर आपण मला ओळखाल की नाही याचीच शंका आहे! (ओळख दाखवाल की नाही, ही शंका आहेच! असो...) स्थित्यंतराचा कळसाध्याय काल पार पडला, तोच येथे विदीत करत आहे. आ. महामॅडम, अंत:करण जड होते म्हंजे नेमके काय होते, हे काल रोजी मुंबईत झालेल्या बैठकीत कळून आले. श्वास आणि पाय एकाच वेळी जड पडण्याला अंत:करण जड होणे असे म्हणतात. चार वर्षांत एकही दिवस, एकही तास, एकही मिनिट माझे अंत:करण कधीही जड झाले नाही. माझ्या कामाच्या टेबलासारखेच माझे अंत:करण कायम स्वच्छ आणि चकचकीत असे. फाइल सोडा, कागदाचा कपटाही टेबलावर राहत नसे. कधीमधी चुकून मी शिपायाला म्हटले, की ‘‘टेबल स्वच्छ पुसून घे बरं!’’ तर तो म्हणे, ‘‘साएब गेल्या महिण्यातच पुसलंय! धुळीचा कन गावनार नाही!!’’ पण काल मात्र माझे अंत:करण मात्र शे-दोनशे फायलींची चळत ठेवलेल्या टेबलासारखे जड जड झाले... महामॅडम, गेल्या चार वर्षांतल्या किती सुंदर सुंदर आठवणी मनात रुंजी घालत आहेत! मोटारीतून उतरण्याआधी तीन-चार लोक दरवाजा उघडायला धावायचे. पायउतार होऊन लगबगीने चालू लागलो की आसपासचे पाचपंधरा लोकही पावलांशी ठेका जुळवत चालू लागायचे. काही कार्यकर्त्यांनी तर माझ्यासारखी हेअरस्टाइल करून (एक बट कपाळावर...आठवले?) घेतली होती. कपाळावरची बट मागे करत मोजके बोलायची माझी पद्धत महाराष्ट्रात फार्फारच फेमस झाली होती. इतकी की आपले पक्षाध्यक्ष रा. रा. माणकोजीराव माझ्याकडे हेव्याने बघायचे. बट नॅचरल ना!! त्यांना बट कोठून येणार? (‘बट नसलेला खट माणूस’ असे त्यांचे वर्णन मी करीत असे!) मुख्यमंत्री असावा, तर असा...अशी माझी प्रतिमा होती. इतकी स्वच्छ प्रतिमा महाराष्ट्रात दुसऱ्या कुणाचीही नाही. किंबहुना, आपल्यापेक्षाही ‘धुतला तांदूळ’ अस्तित्वात आहे, या कल्पनेने आमच्या सरकारातले गृहमंत्री आबाजी कोतवाल असूयेने माझ्याकडे बघत आणि बाकीचे त्यांचे पक्षसहकारी माझ्यावर कमालीचा खार खात असत! पण...गेले, ते दिन गेले!... काल विधिमंडळातील नेता ठरवण्यासाठी झालेल्या बैठकीसाठी ‘वेषांतर करून या किंवा बुरखा तरी घ्या’ असा सल्ला माणकोजीरावांनी दिला होता. पण माझा कारभार म्हंजे स्वच्छ कारभार...कुठं लप्वाछप्वी नाऽऽही!! तस्साच गेलो...आपल्या पक्षाचे अनेक आमदार तेथे हवेत उडणाऱ्या माश्या मुठीत पकडून मला दाखवत होते. मला स्वच्छता प्रिय आहे! त्यांना शाबासकी देणार होतो; पण तेवढ्यात माणकोजीराव म्हणाले, की ते जोरजोराने मुठी आवळून मला दाखवत आहेत! बाप रे!! बैठकीचा हॉल रिकामा रिकामाच होता. मी माणकोजीरावांना विचारले, की ‘बाकीचे आमदार उशिरा का येत आहेत? खुर्च्या रिकाम्या आहेत की!’ तर त्यांनी आवंढा गिळत खोल आवाजात सांगितले की, ‘‘येवढेच निवडून आलेत! काय करता?’’ दिल्लीहून आलेले निरीक्षक मा. मोहनजी प्रकाश यांना सहज ‘हौआर्यु?’ असे विचारले तर त्यांनी उजवा पाय दाखवलान! दचकलोच! मग लक्षात आले की त्यांचा पाय मागल्या वेळी प्लास्टरमध्ये होता! असो. महामॅडम, मला आता पक्षाकडून काऽऽही नको! पंधरा वर्षांत मला पक्षाने चिक्कार काही दिले आहे, त्या पुंजीच्या जोरावर मी कराडात स्थायिक व्हायचे ठरवले आहे. तसे मी बैठकीत सांगून टाकले आहे. माणूस आपली मुळे शोधत परत आपल्या मूळ ठिकाणी येतो, असे म्हणतात. किती खरे आहे ना? गेल्या दोन्ही निवडणुका माझ्या मुळावर आल्या हेच खरे! असो. बाकी भेटीअंती (?) कळावे. आपला. बाबाजी. ता. क. : ...तरीही पक्षश्रेष्ठी सांगतील ती जबाबदारी मी पार पाडीनच! कळले ना? थॅंक्यू!!
Post a Comment