मंगळवेढा / प्रतिनिधी
वीजचोरीला आळा घालण्यासाठी मंगळवेढा तालुक्यात महावितरणने प्रथमच इतिहासातील सर्वात मोठी कारवाई करत २0५ आकडे बहाद्दरांकडून २0 लाख ५४ हजारांचा दंड वसुल केला आहे. यामुळे आकडाधारकांनी या कारवाईचा मोठा धसका घेतला आहे.
मंगळवेढा तालुक्यात मोठय़ा प्रमाणात विजेची चोरी होत असून रोहित्र जळण्याचे प्रकार मोठय़ा प्रमाणावर होत आहेत. गेल्या सहा महिन्यापासून आकडे टाकून वीज वापरणार्याची संख्या वाढत आहे. त्यामुळे कोट्यवधीचा भुर्दंड महावितरणला बसत आहे. वरिष्ठ अधिकार्यांनी जिल्ह्यातील व तालुक्यातील ७0 ते ८0 कर्मचार्यांची १0 पथके कार्यरत केली असून संपूर्ण शहरासह तालुक्यात रात्रंदिवस छापे टाकून वीज चोरी पकडत आहेत. वीज चोरांना सहा महिने बिल आकारून त्याच्या दीडपट दंडाची कारवाई केली जात आहे. जे वीजचोर दंड भरणार नाहीत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची तयारी महावितरणने दर्शवली आहे. तालुक्यातील सलगर बु., सिद्धनकेरी, भालेवाडी, खवे, तळसंगी, गुंजेगांव, घरनिकी, नंदेश्वर, मुढवी, भालेवाडी, आंधळगाव, मरवडे, लेंडवे चिंचाळे, डोणज या गावातील २0५ वीज ग्राहकांवर कारवाई केली आहे. यामध्ये शहरातील ३0 ग्राहकांचा समावेश असून अजून शहरातील व्यावसायिक - घरगुती आकडेबहाद्दरांची तपासणी केली जाणार आहे. महावितरणच्या इतिहासात प्रथमच मोठी कारवाई केली आहे. महावितरणचे उपकार्यकारी अभियंता सुभाष कोळेकर यांनी पदभार घेतल्यानंतर महावितरणचा ढेपाळलेला कारभार सुधारण्यासाठी आक्रमक पाऊल उचलत शेतकरीहिताला प्राधान्य देत वीज चोरांना शॉक दिला आहे. सहा महिन्यात तालुक्यात ३५ लाख रूपयांची वीज चोरी उघडकीस आणली आहे. या धडाकेबाज कारवाईचा धसका वीज चोरांनी घेतला आहे. तसेच शेतकर्यांना त्रास देणार्या वायरमनला निलंबित केले असून एक सहाय्यक अभियंता कारवाईच्या रडारवर आहे. एकीकडे महावितरणने वीज चोरी करणार्यावर कारवाईचा धडाका सुरू केला असताना दुसरीकडे मंगळवेढा महावितरणमधील एक कनिष्ठ अभियंता वीज चोराला पाठबळ देत असल्याचे उघड झाले आहे. याबाबत वरिष्ठ अधिकार्यांनी अधिक्षक अभियंता साळे यांच्याकडे कारवाईसाठी अहवाल पाठवला आहे. हा अहवाल गेल्या दोन महिन्यापासून पडून असून त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही.
Post a Comment