0
पंढरपूर तालुक्यात लिलावासाठी चाचपणी; 
दयनीय रस्त्यांमुळे शेतकरी हवालदिल 
 पंढरपूर / शहर प्रतिनिधी
 सोलापूर जिल्ह्यात वाळू लिलावांची प्रक्रिया सुरू झाल्याने विविध भागातील वाळू ठेकेदार आठवडाभरापासून पंढरपूर तालुक्यात गावोगावी फिरून लिलावाच्या ठिकाणांसह परिसराचा अंदाज घेत आहेत. अगोदरच भीमा नदीकाठच्या बहुतांश रस्त्यांची पार दैना उडालेली असताना पुन्हा वाळू ठेकेदारांच्या गाड्यांचे ताफेच्या ताफे फिरू लागल्याने शेतकरी, सर्वसामान्य नागरीक मात्र हवालदिल झाले आहेत. तालुक्यात रस्त्यांची समस्या फार मोठय़ा प्रमाणावर भेडसावत आहे. विशेषत: भीमा नदीकाठच्या संपूर्ण परिसरातील रस्त्यांची अक्षरश: दैना उडाली आहे. याला नदीतील वाळू साठय़ांचे लिलाव कारणीभूत आहेत. कांही दिवसांपूर्वीच वाळू लिलावांची मुदत संपल्याने नदीकाठच्या भागाने सुटकेचा नि:श्‍वास सोडला होता. सध्या साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू असल्याने गावोगावी ऊस तोडणीला गती आली आहे. मात्र बहुतांश रस्त्याची वाट लागलेली असल्याने त्यातून ऊस भरलेली वाहने कारखान्यापर्यंत पोहोचविताना शेतकर्‍यांसह वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहेत. नदीकाठच्या भागातील डांबरी रस्त्यांचे डांबर तळाला गेले असून मोठमोठे खड्डे पार करताना ऊस वाहतुकीची वाहने पलटी होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातून शेतकर्‍यांच्या उसाचे आणि वाहन धारकांच्या वाहनांचे फार मोठे नुकसान होत आहे. पंढरपूर तिर्‍हे सोलापूर मार्गावर तारापूर नालापर्यंत दररोज एकतरी उसाची ट्रॉली पलटी झालेली दिसते. जिल्ह्याला जोडणारा हा रस्ता असला तरी त्यावर डांबर क्वचितच ठिकाणी दिसते. मोठमोठय़ा खड्डय़ांमुळे या मार्गावरील एस.टी. सेवाही अनेक दिवस बंद राहिली होती. सध्या ऊस वाहतुकीच्या वाहनांची अडचण लक्षात घेऊन नुकतेच देगांव ते सुस्तेपर्यंत डांबरी रस्त्याचे मुरमीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे मोठी वाहने कशीबशी जात असली तरी धुळीत रस्ताच हरवून जात असल्याने दुचाकीस्वार हतबल झाले आहेत. याच मार्गावर सर्वाधिक वाळू लिलाव होणार असल्याने संपूर्ण परिसर हवालदिल झाला असल्याचे चित्र दिसून येत आहे. तालुक्यात शेगांव दुमाला, देगांव-मुंढेवाडी, पोहोरगांव-आंबे, अजनसोंड-चळे, तारापूर-चळे, खरसोळी, आंबेचिंचोली-सरकोली, त.शेटफळ-महमदाबाद आदी ठिकाणच्या वाळू साठय़ांचे लिलाव जाहीर झाले आहेत. ऑनलाईन पध्दतीने लिलाव होणार असल्याने विविध भागातील वाळू ठेकेदार गाड्यांचे ताफे घेऊन लवाजम्यासह नदीकाठच्या गावात पाहणी करीत आहेत. त्या-त्या ठिकाणी अंदाजे उपलब्ध होणारी वाळू, परिसरातील रस्ते, लोकांची मते अशा गोष्टींचा अंदाज ठेकेदार मंडळी घेत आहेत. अनेक मातब्बर राजकारणीही अशा ठेकेदारांच्या आडून लिलावात शिरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्याचवेळी वाळू क्षेत्रातील 'दादा' मंडळींकडे नदीकाठचे कांही 'गावपुढारी' गुपचूप हेलपाटे मारून 'अर्थ'पूर्ण अटींवर 'सहकार्याची' हमी देवू लागल्याची जोरदार चर्चा आहे. मात्र या सगळय़ा प्रक्रियेत रस्त्यांच्या समस्येमुळे हतबल झालेले ऊस उत्पादक शेतकरी, सर्वसामान्य नागरीक संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत. 

Post a Comment

 
Top