0

भाविकांत समाधान
मंगळवेढा / तालुका प्रतिनिधी
मंगळवेढा नगरपालिका व सार्वजनिक बांधकाम खाते यांनी जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्या आदेशाने मंगळवेढा शहरातील अतिक्रमणे आज जेसीबी मशीनच्या सहाय्याने उद्ध्वस्त केली. अतिक्रमण काढले जाणार नाही, राजकीय पुढारी आपले कौशल्य दाखवतील शिवाय बरेच नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते हे मुख्याधिकारी शिल्पा दरेकर यांना भेटले होते. नंतर अधिवेशन चालू आहे त्यामुळे पोलीस बंदोबस्त मिळणार नाही अशी अफवा सोडण्यात आली. या पार्श्‍वभूमीवर अतिक्रमणधारक बिंधास्त होते. परंतु सकाळी दहा वाजता महावितरण कंपनी कार्यालयापासून अतिक्रमण हटविण्यास सुरुवात झाली आणि पाहता-पाहता खोकीधारकांची भंबेरी उडाली. मुख्याधिकारी शिल्पा दरेकर, सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपअभियंता दिनेश परदेशी, नगरपालिकेचे प्रशासन अधिकारी सुनिल वाळूजकर, पोलीस निरीक्षक दिलीप पाटील यांच्यासह २0 पोलीस, नगरपालिकेचे कर्मचारी, होमगार्ड यांनी महावितरण कार्यालयालगत बांधकाम खात्याच्या रस्त्यावर केलेले अतिक्रमण तोडण्यास सुरुवात केली. महावितरणच्या उच्चदाबाच्या वायर त्या ठिकाणाहून गेल्या असताना सुध्दा त्या खाली पत्र्याची खोकी धोकादायकरित्या उभी करण्यात आली होती. गेल्या दोन महिन्यात उजनी कार्यालय ते महावितरण या पट्ट्यात लाखो रुपये खचरुन खोकी टाकून फरशी करुन व्यवसाय सुरु करण्यात आला होता. एक महिन्यापूर्वी सावंजी नावाच्या तरुणाने रेस्टॉरंट सुरु केले होते. पहाटे पाच वाजता उठून चहा विक्री करणार्‍या या तरुणाला डोळ्यादेखत आपले खोके तोडले जात असल्याची वेळ आली. जेसीबी ने दोन प्रयत्नात हे खोके उद्ध्वस्त केले. यावेळी खोकीधारकात नाराजी निर्माण झाली. बघ्यांनी गर्दी केली होती. परंतू अतिक्रमण विरोधी पथकातील कामगारांच्या डोळ्यात पाणी आले होते. परंतू शासन निर्णय व जिल्हाधिकार्‍यांचा धसका यामुळे सलग खोकी काढण्यात आली, नव्हे तोडली गेली आणि महावितरण, उजनी कार्यालय करत हे पथक पोलीस स्थानकाजवळ आले. या ठिकाणी सुमारे १२५ भंगार विक्रेत्यांनी अवैधरित्या झोपडपट्टी उभी केली आहे. त्यावर कारवाई सुरु करण्याचा प्रय▪होताच, त्यांनी दोन दिवसाची मुदत मागीतली आहे. पुन्हा हे पथक मंगळवेढा बसस्थानकाच्या पंढरपूर रस्त्याला असलेल्या सर्व खो्नयांवर तुटून पडले. तर दुसर्‍या पथकाने पंचायत समितीलगत असलेली सर्व खोकी काढून टाकली. एस.टी.बसस्थानक ते दामाजी चौक हा रस्ता अतिक्रमण धारकाने व्यापून टाकला होता. अरेरावीमुळे नाराजी निर्माण झाली होती. दामाजी चौकात अनेकांनी आपला व्यवसाय प्रामाणिकपणे करण्याचा प्रय▪केला होता. परंतू या चौकात दामाजीसुध्दा व्यापला गेला होता. एका बाजूला वाहनधारकांचे अतिक्रमण, दुसर्‍याबाजूला फले व फळे विक्रेत्यांचे अतिक्रमण तर चहाच्या टपर्‍या, पान टपर्‍या यांनी या चौकातून जा-ये करणारांच्या नाकात दम भरवला होता. परंतू आज पोष्ट कार्यालयालगत पासूनचा चौक मोकळा केला गेला आणि खर्‍या अर्थाने दामाजी चौक बर्‍याच वर्षाने मोकळा श्‍वास घेवू लागला. त्यानंतर आमदार भारत भालके यांच्या संपर्क कार्यालयासमोर लावलेला फलक पथकाने बाजूला काढून टाकला आणि कारवाई ही कोणत्याही राजकीय व्देषापोटी किंवा दबावापोटी किंवा भितीपोटी केली जात नसून सरसकट नियमानुसार केली जात असल्याचे दाखवून दिले. मग मात्र अनेक व्यापार्‍यांनी सावलीसाठी केलेले शेड स्वत:हून काढले. नंतर पथकाला अधिक काम राहिले नाही, शिवप्रेमी चौक,चोखामेळा चौक, मुरलीधर चौक, बँक ऑफ इंडिया परिसर या ठिकाणी पटापट कारवाई केली गेली. बर्‍याच दिवसातून रतनचंद शहा बँकेसमोरील मैदान नागरिकांना मोकळे झाल्याचे दिसले. आठवडा बाजारात कडक कारवाई केली गेली असून सर्व खोकी काढली गेली आहेत. ज्यावेळी शिवप्रेमी चौकात शॉपींग सेंटर उभारण्यात आले. त्यावेळी सभागृहातील सदस्यांनी जवाहरलाल प्रशालेजवळ व आठवडा बाजाराच्या एका बाजूला पर्यायी जागा दिली होती. आज मात्र यामधील एकाही खोकेधारकाला आपल्या जागेवर व्यवसाय करता आला नाही. या उलट आहे त्या अवस्थेत खोकी उचलून नेण्याची वेळ आली. यामुळे आठवडा बाजार, जवाहरलाल प्रशाला या ठिकाणी मोकळेपणा आला आहे. आता जवाहरलाल हायस्कूलमध्ये जा-ये करणार्‍या विदय़ार्थ्यांना कोणाचा त्रास होणार नाही, तर आठवडा बाजारात भाजी विकण्यासाठी आलेल्या विक्रेत्यांना खोकीधारकाच्या दारातून कोणी हुसकावून लावणार नाही. दरम्यान अनेकांनी पोटभाडेकरु नेमले होते. तर काहीजणांनी दुकानाचा विस्तार करण्यासाठी शेजारचे खोके विकत घेतले होते. एका टेलरने आठ दिवसापुर्वी ७0 हजार रुपये खाजगी सावकाराकडून घेवून हे खोके खरेदी केले होते. नवव्या दिवशी खोकेही गेले आणि पैसेही गेले अशी दुर्दैवी वेळ त्या टेलरवर आली आहे. बोराळेनाका परिसरात देखील अतिक्रमण पथकाने हातोडा फिरवला आहे. आता राहिलेली मोहिम दोन दिवसात पुर्ण केली जाणार आहे. आता बर्‍याच जणांनी अतिक्रमण केले आहे. परंतू नगरपालिकेचे त्याकडे लक्ष नाही, या शिवाय स्वत: नगरपालिकेने काही ठिकाणी अतिक्रमण केले आहे. यावर हे पथक कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

 
Top