0
 पंढरपूर / तालुका प्रतिनिधी
 गाळप हंगाम सुरू होवून दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेला तरी जिल्ह्यातील कारखानदार पहिला हप्ता किती रूपयाचा देणार? हे निश्‍चित झालेले नाही. दरम्यान, कोल्हापूर २५00, सांगली १९00 तर पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी १८00 रूपये प्रमाणे पहिला हप्ता शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करण्यास सुरूवात केली असताना, सोलापूर जिल्ह्यात मात्र, १५00 रूपये अँडव्हान्स म्हणून शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत. याबाबत विविध शेतकरी संघटनांनी आंदोलन सुरू केले असले तरी, यंदा आंदोलनाची धार बोथट झाल्याने ऊस उत्पादक शेतकरी अस्वस्थ झाले आहेत. सर्व संघटनांनी एकत्रित येऊन याबाबत शासनावर दबाव वाढवावा. आंदोलन तीव्र करण्यात यावे, अशी भावना शेतकर्‍यांकडून व्यक्त करण्यात येऊ लागली आहे. खते, औषधे, मजुरी यामध्ये वाढ झालेली असताना ऊसाला भाव मात्र गतवर्षीपेक्षा कमी मिळत असेल तर तो कसा परवडणार? बॅँकांकडून घेतलेले कर्ज, शेतीसाठी केलेला खर्च वजा करता हातात काय राहणार? ही चिंता शेतकर्‍यांना सतावत असून, ऊसाला योग्य भाव मिळावा यासाठी शासनाने तातडीची अर्थिक मदत करावी, अशी मागणी होत आहे. ऊस दराच्या आंदोलनात दरवेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना अधिक अक्रमकपणे मैदानात उतरत असते. यंदा या संघटनेमध्ये फुट पडल्याने त्याचा आंदोलनावरही परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि त्यांच्यातून फुटून तयार झालेली बळीराजा शेतकरी संघटना ही आपापल्या पध्दतीने आंदोलन करीत आहे. गाळप हंगाम सुरू होवून दोन महिन्यांचा कालावधी उलटला तरी अद्याप तीव्र असे आंदोलन झालेले नाही. शेतकरी संघटना शांत का आहेत? अशी विचारणा करीत असताना बडे बागायतदार शेतकरी मात्र, आंदोलनापासून चार हात लांब असल्याचे चित्र आहे. त्यांच्याकडून केवळ बघ्याची भूमिका घेण्यात येत असून, संघटनेत पडलेल्या फुटीवर आणि कोणता नेता कसा आहे? यावर चर्चा सुरू असल्याचे दिसून येते. यामुळे ऊस दराचा प्रश्न मात्र बाजूला पडत आहे. आंदोलनाला धार आल्याशिवाय शासन ऊसदराच्या प्रश्नाकडे गांभिर्याने पाहणार नाही. पुढच्या चार ते पाच दिवसात योग्य तोडगा न निघाल्यास आंदोलन उग्र करण्यात येऊ शकते, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या एका पदाधिकार्‍यांने सांगितले. 

Post a Comment

 
Top