तलाठी नागन्नाथ जोध मारहाण प्रकरण
मंगळवेढा / तालुका प्रतिनिधी
चलनावर सही करण्यास नकार दिल्यामुळे मंगळवेढा तालुका तलाठी संघटनेचे अध्यक्ष नागन्नाथ जोध यांना नगरसेवक प्रविण खवतोडे, माजी नगरसेवक विजयकुमार खवतोडे व इतर पाच जणांनी दि. २९ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता मंगळवेढा तहसील कार्यालयात मारहाण केली. यामध्ये जोध यांच्या डोळ्यास गंभीर जखम झाली असून त्यांनी मंगळवेढा पोलीस ठाण्यात पाचजणांविरुद्ध फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करुन तपास सुरु केला आहे. दि. २९ डिसेंबर रोजी मंगळवेढा तहसील कार्यालयात महसूल अदालत आयोजित करण्यात आली होती. नागन्नाथ जोध शासकीय कामात व्यस्त होते, तेव्हा कागदपत्राची बजावणी करत असताना नगरसेवक प्रविण खवतोडे यांनी दि. २६ डिसेंबर रोजी माझे वडील तुमच्याकडे चलन घेऊन आले होते, तुम्ही चलनावर सही का केली नाही? याचा जाब विचारत व निराशेपोटी त्या पाच जणांनी जोध यांना मारहाण केली. तोंडावर, पाठीवर, डोक्यावर मारहाण करण्यात आली असून जोध यांचा चष्मा फुटला असून डोळ्याला जखम झाली आहे. सही न केल्याचा मनात रोष धरून संगनमत करून शासकीय कर्तव्य पार पाडत असताना पाच जणांनी अडथळा आणला व सॅमसंग कंपनीचा मोबाईल हँडसेट हिसकावून घेतला. अशा प्रकारची फिर्याद नागन्नाथ जोध यांनी मंगळवेढा पोलीस ठाण्यात दिली आहे. आज महसूल संघटनेच्यावतीने संघटनेचे पदाधिकारी, सदस्य, पोलीस ठाण्यात उपस्थित होते. तलाठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाकीशा मकानदार, माळशिरसचे उत्तम मस्के, गणेश साळुंखे, नंदकुमार वाकसे, पांडुरंग कोकरे, दीपक राऊत, दिगंबर मोरे, मंडलाधिकारी वासुदेव शिंदे, विमल गुप्ता, पी.व्ही. भितकर, वैशाली पवार यांनी एकत्र येऊन जोध यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा निषेध केला आहे. या प्रकरणाची चौकशी करून कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment