राहुल भाकरे
मंगळवेढा तालुक्यात २0१४ हे वर्ष निवडणुकीतील आरोप प्रत्यारोप, गारपीठ, अवकाळी पाऊस, बोराळे खून प्रकरण व बेधडक केलेल्या अतिक्रमणाच्या कारवाईमुळे हे वर्ष गाजले.
लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसकडून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे तर भाजपाकडून खा. शरद बनसोडे हे एकमेकाविरोधात उभे होते. देशातील मतदारांचा मूड मंगळवेढय़ातही कायम राहिला. माजी गृहमंत्री शिंदे यांची मोठी पिछेहाट करत प्रथमच खा. बनसोडे यांना मोठय़ा प्रमाणात मताधिक्य मिळाले. तर विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून आ. भारत भालके, स्वाभिमानीकडून प्रशांत परिचारक तर शिवसेनेकडून समाधान आवताडे उभे असताना विकास कामाच्या जोरावर पाणीप्रश्नाचा मुद्दा पुढं करत मागील निवडणुकीप्रमाणे आ. भालके यांनी बाजी मारली. परिचारकांना निसटता पराभव पहावा लागला तर प्रथमच उभे असलेल्या समाधान आवताडे यांनी मात्र तालुक्यात समाधानकारक मते मिळवत आपला गट शाबूत ठेवण्याचे काम केले.
तसेच तालुक्यात पडलेल्या गारपीठीमुळे शेतकरी गारठला होता. या गारपिठीमध्ये डाळींब, द्राक्ष, ज्वारी, कांदा, हरभरा व पालेभाज्यांचे खूप मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले होते. यावेळी गारपीठीवरून मंगळवेढा तालुक्यात खूप मोठय़ा प्रमाणात राजकारण झाले. गारपीठीच्या नुकसान भरपाईसाठी सर्वपक्षीय पदाधिकार्यांनी मोर्चा काढत आमदारांना लक्ष केलं होतं. यामध्ये आ. भालके यांनी आपली सर्व शक्ती पणाला लावत शेतकर्यांना गारपीठीची नुकसानभरपाई मिळण्यासाठी प्रय▪केले. त्यावेळी गारपीठीची नुकसानभरपाई सर्व शेतकर्यांना मिळाली. तसेच मंगळवेढा तालुक्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी मेटाकुटीला आला. या पावसामध्ये ज्वारीचे कोठार समजल्या जाणार्या या नगरीतील ज्वारीची मोठय़ा प्रमाणावर हानी होत पांढरे टपोरे दाणे असलेली ज्वारी आता मात्र काळी पडली असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले होते. तसेच डाळिंबीवर पडलेल्या तेल्या व द्राक्ष बागांवर पडलेला दावण्या रोग यामुळे तालुक्यातील फळबागायतदारांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसाची नुकसान भरपाई शेतकर्यांना अद्यापपर्यंत मिळाली नाही.
मुलगा होत नसल्याच्या कारणावरून पत्नीची अत्यंत क्रुरपणे हत्येच्या बोराळे येथे घडलेल्या घटनेमुळे सारा जिल्हा हादरून गेला. या घटनेमधील त्या पाच मुलींना मदत करण्यासाठी विविध सामाजिक संघटना सरसावल्या. तसेच या घटनेची दखलही मोठय़ा प्रमाणात घेण्यात आली. सरत्या वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता मंगळवेढय़ाच्या इतिहासामध्ये प्रथमच मोठय़ा प्रमाणात अतिक्रमणाची कारवाई केली. त्यामुळे हा विषय शहरासह तालुक्यामध्ये गाजला. एकूणातच मंगळवेढावासियांसाठी २0१४ हे वर्ष निवडणुकीतील आरोप प्रत्यारोप, गारपीठ, अवकाळी पाऊस, बोराळे खून प्रकरण व बेधडक केलेल्या अतिक्रमणाच्या कारवाईमुळे गाजले.
Post a Comment