0

नागपूर
दुष्काळग्रस्त शेतकऱय़ांना पॅकेज देण्याच्या मुद्द्यावरून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या दोन्ही विरोधी पक्षांनी मंगळवारी विधानसभा आणि विधान परिषदेत गोंधळ घातला. यामुळे दोन्ही सभागृहाचे कामकाज सातत्याने तहकूब करावे लागले. चर्चा नको, पॅकेज जाहीर करा ही मागणी विरोधकांनी लावून धरल्यामुळे दुपारी विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
सत्ताधाऱयांना दुष्काळाचे गांभीर्य नाही, असा आरोप करीत कॉंग्रेसचे गटनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी चर्चा करण्यापेक्षा पॅकेज जाहीर करण्याची मागणी केली. विधानसभेमध्ये याच मुद्द्यावरून विरोधकांनी गोंधळ घातल्यामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. तत्पूर्वी विधान परिषदेमध्येही विरोधकांनी हाच मुद्दा लावून धरीत सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे विधान परिषदेचे अध्यक्ष शिवाजीराव देशमुख यांनी सुरुवातीला २० मिनिटांसाठी कामकाज तहकूब केले. कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर विरोधकांनी अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत जमून घोषणाबाजी सुरूच ठेवल्यामुळे कामकाज पुन्हा तहकूब करण्यात आले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांनी याच मुद्द्यावरून सरकारवर टीका करणारे फलक घेऊनच मंगळवारी विधीमंडळाच्या आवारात प्रवेश केला. 'मुख्यमंत्र्यांची लाडूतुला, शेतकऱयांसाठी आभाळखुला' अशा आशयाचे फलक घेऊन निषेधाच्या घोषणा देत राष्ट्रवादीचे आमदार विधीमंडळात आले. पक्षाच्या विधीमंडळ गटाचे नेते अजित पवार यांनीही शेतकऱयांना तातडीने मदत देण्याची मागणी केली.

Post a Comment

 
Top