ब्रह्मपुरीच्या सुनील पाटील यांचा शेतीत विक्रम
नदीकाठची शेती..मुबलक पाणी म्हटले की, प्रत्येकाच्या डोक्यात येते ती ऊस शेती. मात्र, केवळ ऊस शेती न करता उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करुन कमी पाण्यावरील शेतीकडे वळून शेडनेट हाऊस शेतीच्या माध्यमातून लाखो रुपये कमवून स्वत:बरोबरच इतर युवकांनादेखील प्रेरीत करणार्या ब्रह्मपुरी (ता.मंगळवेढा) येथील सुनील पाटील या युवकाने अवघ्या दहा महिन्यात शेडनेट शेतीच्या माध्यमातून एक एकर जमिनीतून ९0 टन ढोबळी मिरचीचे उत्पादन घेऊन विक्रम प्रस्थापित केला असून, त्यात त्यांना सुमारे १८ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. एवढय़ावरच न थांबता याच पिकाचे १५0 टन उत्पादन घेण्याचे ध्येय पाटील यांनी ठेवून नव्याने शेती करणार्यांपुढे एक आदर्श घालून दिला आहे. ब्रह्मपुरी हे गाव भीमा नदीकाठी असून या गावात प्रामुख्याने १00 टक्के ऊस शेती केली जाते. परंतु निसर्गाचा लहरीपणा व पाण्याचे कमी होत जाणारे प्रमाण पाहता येथील युवा शेतकरी सुनील पाटील यांनी ठिबक सिंचनवरील ऊस शेती असतानासुद्धा शेडनेट शेतीकडे वळण्याचा धाडसी निर्णय घेतला. याचे कारण असे की, उसाचे पीक हे सुमारे दीड वर्ष सांभाळावे लागते. त्यासाठी पाणी, खत, मजुरी आणि उसाला मिळणारा भाव याचे गणित पाहता ऊस शेती तोट्याची ठरत आहे. ही गोष्ट वेळीच ओळखून दुष्काळी भागातील प्रकाश काळुंगे, संभाजी नागणे, प्रशांत चव्हाण, रावसाहेब पाटील, जनार्दन कोंडूभैरी, ईश्वर गडदे यासारख्या युवा शेतकर्यांना एकत्रित आणून कृषीधन फार्र्मस क्लबची स्थापना केली. कमी पाण्यावरील शेती व त्यामध्ये घेतल्या जाणार्या पिकांचा अभ्यास सुरू केला. यासाठी शेडनेट हाऊस शेतीचा पर्याय निवडला व राज्यात पहिल्यांदा एकाचवेळी एकाच तालुक्यात २0 शेडनेट हाऊस उभारण्याची संकल्पना त्यांनी राबवली. शेडनेट हाऊस शेती संदर्भात नाशिक, ठाणे, कोल्हापूर, सांगली, नगर या भागातील शेडनेट हाऊसना भेटी देऊन त्यातील उणिवा व फायद्याच्या गोष्टी जाणून घेतल्या. या उणिवा दूर करत टनेल पद्धतीची एका एकराची शेडनेट स्वत:च्या शेतात उभे केले व एप्रिल २0१४ मध्ये त्यामध्ये इंद्रा जातीच्या रोपांची लागण केली. परंतु, सुरुवातीला रोपांच्या बाबतीत माहिती नसल्यामुळे काही रोपांना मर रोग आला. मात्र हाताश न होता त्यांनी जिद्दीने पुनर्लागवड करत ढोबळी मिरची चांगल्या पद्धतीने आणून दाखवली. यासाठी त्यांना वडील प्रताप पाटील, भाऊ रवी व सुहास यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच ओम अँग्रोचे सोमनाथ नकाते, अँग्रो ग्रीन इंडियाचे कपिल गवस यांची देखील मदत झाली. त्यांनी प्रारंभी शेतीमध्ये शेणखत, भेसळ डोस, मळी यासह जैविक खतांचा वापर, शेळी व जनावरांचे मूत्र, गांडुळ खताचा वापर करून योग्य प्रमाणात पाणी व गरजेनुसार विविध रोगावरील फवारण्या वेळेवर केल्या. त्यामुळे त्यांचा प्लॉट सध्या दहा महिने होऊन देखील नवीन लागवडीप्रमाणे सुस्थितीत आहे. सध्या त्यांच्या प्लॉटमधून महिन्याला १३ ते १४ टन मिरचीचे उत्पादन होत आहे. आजपर्यंत ९0 टनाचे उत्पादन त्यांनी घेतले आहे. सुरुवातीचे आठ महिने बाहेरील व्यापारी येऊन जागेवरच रोखीने मिरची खरेदी करीत होते. सध्या वाशी मुंबई येथे मिरची विक्रीसाठी पाठवली जात आहे. त्यांनी केवळ मिरचीबरोबरच ठिबकवरील ऊस त्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केलेले फर्टीगेशन यंत्र वापरात आणले आहे. तसेच ३00 शेळ्यांचे शेळीपालन देखील उत्कृष्ट पद्धतीने सुरू असून त्यातून चांगली आर्थिक प्राप्ती होत आहे. शेळीपालन, ऊस, शेडनेट हाऊस तसेच नव्याने सुरू करीत असलेल्या म्हैस व कालवड संगोपनाचा देखील वेगळा प्रयोग करीत आहेत. मंगळवेढा तालुक्यातील सर्वात मोठा गांडुळ खत प्रकल्प व मुक्त गोठा पद्धतीचा अवलंब करीत म्हैस व कालवड संगोपनाचा चालू वर्षात पूर्ण करणार आहे.
'माध्यमांशी बोलताना पाटील म्हणाले की, सध्याच्या चालू प्लॉटमधून ढोबळी मिरचीचे दीडशे टन उत्पादन अपेक्षित असून जिल्ह्यात शेडनेट हाऊस चांगल्या पद्धतीने राबवावे यासाठी प्रय▪करणार आहे. त्या अनुषंगाने नव्याने शेडनेट हाऊस उभारणी सुरू केली आहे. शेडनेट हाऊसबरोबरच शेळीपालन, गांडुळखत प्रकल्प, म्हैस व कालवड संगोपन मुक्त गोठा पद्धतीने सुरू करणार आहे.
- सुनील पाटील, ब्रह्मपुरी.
(मो. ८८0६0१९२00)
Post a Comment