0

पंढरपूर / शहर प्रतिनिधी
भरधाव वेगाने निघालेल्या टँकरने मोटारसायकलला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने दोनजण ठार झाले. ही घटना शनिवारी (दि.२१) दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास येथील कॉलेज क्रॉस पोलीस चौकीसमोर घडली. श्रीकांत रामदास पाठक (वय ४१, रा. पुजारी सिटी कॉम्प्लेक्स) व नागेश बब्रुवान शेटे (वय ३५, रा. इसबावी-पंढरपूर) अशी अपघातात ठार झालेल्या दोघांची नावे आहेत. अकलूजकडून पंढरपूरकडे आलेला टँकर (एम.एच. 0४ / ई.बी. ६0१0) शनिवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाशेजारील चौकातून बायपास रस्त्याने नवीन पुलाकडे निघाला होता. भरधाव वेगाने आलेल्या या टँकरने चौकातील पोलीस चौकी समोरच मोटारसायकलला (एम.एच. १२ / ई.पी. ९४८७) पाठीमागून जोरदार धडक देऊन फरफटत नेले. यामध्ये जबर मार लागून श्रीकांत पाठक हे जागीच ठार झाले. नागेश शेटे यांना गंभीर जखमी अवस्थेत जवळच असलेल्या श्री विठ्ठल हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला. अपघात होताच टँकरचा चालक पसार झाला. टँकरची धडक इतकी जोराची होती की मोटारसायकल टँकरखाली अडकून सुमारे ३0-३५ फूट अंतरापर्यंत फरफटत गेली. अखेर क्रेनच्या सहाय्याने टँकर उचलून मोटारसायकल बाहेर काढावी लागली. घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता. मुख्य चौक असल्याने कांही वेळातच बघ्यांची प्रचंड गर्दी झाली. सायंकाळी शहर पोलीस ठाण्यात वसंत जोशी यांनी फिर्याद दाखल केली असून टँकर चालकाविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक एम.बी. माने हे करीत आहेत.

Post a Comment

 
Top