0

मुस्तीचा मंडल अधिकारी देवकुळे अटकेत

सोलापूर / प्रतिनिधी
फेर रजिस्टरला नोंद घेऊन ती प्रमाणित करण्यासाठी लाचेची मागणी करुन त्या बदलत्या ११६६ रुपयांच्या दारुच्या बाटल्या घेताना दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्तीचा मंडल अधिकारी (सर्कल) उत्कर्ष वसंतराव देवकुळे (वय ४0) याला सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने जिल्हाधिकारी कार्यालय आवारात सापळा रचून अटक केले. तक्रारदार यांची मुस्ती (ता. दक्षिण सोलापूर) येथील गट नं. ७७/१ व ७७/३ येथे शेतजमीन असून या शेतजमिनीचे विभाजन होऊन दक्षिण सोलापूर तहसीलदार यांनी गटविभाजन न करता समाईकात नाव व हिश्याप्रमाणे क्षेत्र दाखल करण्याकरिता परवानगी देण्यात येत आहे, असा आदेश तक्रारदार यांचे नावे काढला होता व त्याची प्रत गाव कामगार तलाठी, मुस्ती यांना दिली होती. त्यानंतर तलाठी मुस्ती यांनी फेरफार रजिस्टरला याबाबत नोंद धरली आहे. परंतु सदरची नोंद प्रमाणित करण्यासाठी मुस्तीचा मंडल अधिकारी (ता. दक्षिण सोलापूर) उत्कर्ष देवकुळे याने तक्रारदारांना लाचेच्या स्वरुपात दारुच्या बाटल्यांची मागणी केली होती. यावरुन त्यांनी एसीबीकडे तक्रार केली होती. या तक्रारीनुसार २१ फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालय दक्षिण सोलापूर येथे उत्कर्ष वसंतराव देवकुळे (वय ४0) याच्याविरुध्द लाचेचा सापळा लावला. लावण्यात आलेल्या सापळ्या दरम्यान मंडल अधिकारी देवकुळे यांनी फेरफार रजिस्टरवरील नोंद प्रमाणित करण्याकरिता लाचेच्या स्वरुपात दारुच्या दोन बाटल्यांची मागणी करुन ११५५,६0 रुपये किंमतीच्या मिलिट्रीच्या दारुच्या बाटल्या दक्षिण तहसील कार्यालय परिसरात स्वीकारत असताना उत्कर्ष देवकुळे याला रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणी आरोपी उत्कर्ष देवकुळे याच्याविरुध्द सदर बझार पोलीस स्टेशन येथे लाचलुचपत कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून याचा तपास पोलीस निरीक्षक एस.बी. साळुंखे हे करीत आहेत.

Post a Comment

 
Top