0

आज यांत्रिकीकरणाच्या युगामध्ये शेतीमधील कामे आधुनिक पद्धतीच्या यंत्राद्वारे केली जातात त्यामुळे ग्रामीण भागात पुर्वी गावोगावी बैलाद्वारे करण्यात येणारी शेतीची मेहनत इतिहासजमा होत आहे व त्याची जागा ट्रॅक्टरसारख्या अत्याधुनिक यंत्रणेने घेतली आहे. ग्रामीण भागात पुर्वी गावोगावी आढळणारे जनावरांचे कळप आता इतिहासजमा झाले आहेत. पाळीव जनावरांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. त्यातच सततचा होणारा दुष्काळ नापिकी अवकाळी पावसामुळे जनावरांचा चारा व पाण्याची समस्या तीव्र झाली आहे. त्यामुळे शेतकरी व शेतमजूरांनी आपली जनावरे मिळेल त्या भावात विक्रीस काढली आहेत. ग्रामीण भागात अद्यापही ९0 ते ९५ टक्के जनता ही शेतीवर अवलंबून आहे. याच कृषी उद्योगाला मात्र विशेष दर्जा प्राप्त झाला नाही. त्यामुळे जगाचा पोशिंदा अडचणीत आला आहे ही एक शोकांतिका आहे. शेतकरी मशागतीसाठी पुर्वी बैलाचा वापर करत. शेतकर्‍यांचा मित्र म्हणून बैलाची ओळख ग्रामीण भागामध्ये निर्माण झाली होती. त्या बैलांना जन्म देणारी गोमाता म्हणून ओळखले जाते मात्र विज्ञानाच्या प्रगतीमुळे शेतकरी आता यांत्रिकीकरणाकडे वळून अत्याधुनिक पद्धतीने शेती करीत आहे. त्यातच औताच्या सहाय्याने शेती करण्यासाठी व बैलाद्वारे शेतीची मशागत करण्यासाठी सालगडीही मिळणे कठिण झाले आहे. सालगड्याच्या वेतनाचे भाव हे गगनाला भिडले आहेत. त्यामुळे औताने शेती करणे शेतकर्‍यांना परवडत नाही. ज्याच्याकडे जितके औत तितका शेतीचा दर्जा मोठा असा फार पुर्वी शेतकर्‍यांचा समज होता. परंतु, आता यांत्रिकीकरणाच्या युगामध्ये बैलाची जागा ट्रॅक्टरने घेतली आहे व ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतातील नांगरणी, कोळपणी इत्यादी कामे केली जातात. ही शेतीची मशागत करण्यासाठी लागणारा वेळही थोडा लागतो. आता शेतीच्या मशागतीबरोबर ज्वारीची पेरणी सुद्धा ट्रॅक्टरच्या सहाय्याने केली जाते. आज मंगळवेढय़ाच्या शिवारामध्ये करडई व गहू काढण्यासाठी पंजाबहून हार्वेस्टर पद्धतीच्या मशीन शिवारात दाखल झाल्या आहेत व त्याद्वारे काढणी केली जात आहे. आजही ग्रामीण भागामध्ये गावरानी बैल कष्टाळू म्हणून ओळखला जातो. शेतकर्‍यासोबत शेतमजूरही आपल्याकडे म्हैस किंवा गाय नाही तर किमान बकरी तरी पाळत होते. त्यामुळे ग्रामीण भागात धवलक्रांती झाली होती. परंतु, आज या यांत्रिकीकरणाच्या जमान्यामध्ये शेतकरी अत्याधुनिक यंत्राकडे वळाला असून नवनवीन टेक्नॉलॉजी वापरून शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करत मोठय़ा प्रमाणात उत्पादन घेण्याकडे शेतकर्‍यांचा कल वाढला असल्यामुळे बैलाद्वारे करण्यात येणारी मशागत इतिहासजमा होत आहे.

Post a Comment

 
Top