विविध संस्थांमध्ये निष्ठावंत कार्यकर्त्याला परिचारक गटाने नेहमीच संधी दिली आहे. यंदाच्या विधानसभा निवडणूकीनंतर, काही सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याचे गटातील नेत्यांना उमजून आलेले असावे. केवळ सर्वाधिक दर देऊन किंवा आर्थिक सहाय्य करून सर्व लोक बरोबर येतीलच असे नाही, लोकांना समजून घेत पुढे जाणेही तितकेच महत्वाचे आहे. प्रशांत परिचारक यांचे नेतृत्व स्विकारत असताना सुधाकर परिचारक यांना मानणारा एक वर्ग आहे. पांडुरंग सहकारीच्या माध्यमातून हे पुन्हा एकदा आधोरेखीत होत असून, कस.. तर पंत म्हणतील तस..अशीच चर्चा परिचारक गटात सध्या सुरू आहे.
श्रीपूर येथील पांडुरंग सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध होणार हे स्पष्ट झाल्यानंतर, कारखान्याच्या चेअरमन आणि व्हा चेअरमनपदाबाबत कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता असणार आहे. निवडणूकीदरम्यानच्या घडामोडी आणि माजी आमदार परिचारक यांनी कार्यकर्ता बैठकीत घेतलेली आक्रमक भूमिका लक्षात घेता, यावेळी ते स्वत: कारखान्याची सुत्रे हाती घेतली असा कयास बांधण्यात येत आहे.
विधानसभा निवडणूकीत पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून जिल्हा दूध संघाचे चेअरमन प्रशांत परिचारक यांना पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर परिचारक गटाची बांधणी करण्यासाठी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह कायम रहावा यासाठी माजी आमदार परिचारक यांच्याकडून प्रय▪सुरू आहेत. थेट कार्यकर्त्यांमध्ये मिसळून आणि त्यांचे मत आजमावून पुढे जाण्याची त्यांची भूमिका असते. प्रशांत परिचारक यांना विधानसभेसाठी संधी देत असताना सुधाकर परिचारक यांनी पंढरपूर शहरामध्ये प्रचारात सक्रीय सहभाग नोंदविला होता. परंतु, शहरात अपेक्षित मताधिक्य मिळाले नसल्याचे शल्य त्यांना निश्चित असणार. पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांमध्ये सर्वाधिक दर देण्याची भूमिका त्यांनी घेतली. मात्र, त्याचा अपेक्षित असा राजकीय फायदा परिचारक गटाला झाला नाही.
लोकांमध्ये मिसळत असताना, त्यांच्या अडी-अडचणी सोडवत असताना संबंधित संस्थेचे पद नसेल तर लगेच एकादा निर्णय घेता येत नाही. त्यातूनच कार्यकर्ता मेळाव्यात माजी आमदार सुधाकर परिचारक हे संचालक मंडळात असावेत असा विचार कार्यकर्त्यांमधून पुढे आला होता. त्यानुसार ते संचालक मंडळात सहभागी झाले आहेत. ते कारखान्याची सुत्रे हाती घेतील असाही कायस बांधण्यात येत आहे. विद्यमान चेअरमन दिनकर मोरे, माजी सभापती वसंतराव देशमुख यांच्या नावावरही चर्चा होवू शकते. मात्र, अंतर्गत वाद-विवाद टाळण्यासाठी आणि परिचारक गट अधिक भक्कम करण्यासाठी यावेळी वेगळा निर्णय घेतला जाण्याची शक्यता अधिक आहे.
- सतीश बागल
Post a Comment