0

मंगळवेढा /प्रतिनिधी
: संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी समाजातील चाली रुढी परंपरेवर प्रहार करत समाजाला वेदांचा खरा अर्थ दाखवून दिला. अभंगाच्या माध्यमातून महाराजांनी खूप मोठे समाज प्रबोधन केले असल्याचे प्रतिपादन युवा उद्योजक समाधान आवताडे यांनी केले. चिक्कलगी येथे जगदगुरू संत तुकाराम महाराजांचा (वैकुंठगमन) बीज सोहळयाप्रसंगी ते बोलत होते. संत बागडेबाबांची तपोवन भूमी असणार्‍या चिक्कलगी येथे हजारो भविकांच्या साक्षीने बीजसोहळा पार पडला. यावेळी संत बागडे महाराज तपोवन रेवणसिध्द चिक्कलगी भुयाराचे मठाधिपती तुकारामबाबा व युवा उद्योजक समाधान आवताडे यांच्या प्रमुख उपस्थितीत बागडेबाबा अक्षर समाधी मंदिराच्या मुर्तीची प्रतिष्ठापना केली. यावेळी आवताडे पुढे बोलताना म्हणाले, संत श्रेष्ठ जगदगुरू तुकाराम महाराजांना विद्रोही असेही म्हटले जाते. विद्रोही म्हणजे काय? समाजामध्ये प्रचलित असलेल्या चालीरीतीमधील खोलपणा लक्षात आल्यावर त्यांना कोण काय म्हटले याचा विचार न करता उघडपणे विरोध करणे म्हणजे विद्रोही होय आणि उघडपणे विरोध करण्याची हिंमत तुकाराम महाराजांनी दाखवून आपल्या किर्तन व अभंग वाणीतून एक आदर्श ठेवला. यावेळी ज्ञानोबा ऽऽ तुकाराम, ज्ञानेश्‍वर माऊली, तुकारामऽऽ तुकाराम असा नाम घोष करीत मृदंगाच्या गजरांने तपोवन भूमी दुमदुमली. या बीज सोहळयासाठी मंगळवेढा तालुक्यातील विविध गावातून लोक तपोवन भूमीत दाखल झाले होते. भाविकांनी गुलाल व फुले उधळून बीज मोठया उत्साहात साजरी केली.

Post a Comment

 
Top