जि.प. उपाध्यक्ष देशमुख यांची माहिती
सोलापूर -
जिल्हा परिषदेच्या उत्पन्नात वाढ व्हावी, यासाठी जिल्ह्यात जि.प. मालकीच्या मोक्याच्या ठिकाणी असणार्या जागांवर व्यापारी गाळे बांधण्यात येणार असल्याची माहिती उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख यांनी दिली. वैराग, करमाळा, माळशिरस, आंधळगाव येथे लवकरच प्रायोगिक तत्वावर ९0 गाळे बांधकाम सुरू करण्यात येणार असल्याचेही देशमुख म्हणाले. वैराग येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर १0, करमाळा २५, माळशिरस ५0, आंधळगाव (ता. मंगळवेढा) ५ असे गाळे बांधण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शासकीय निधीतील २ कोटी रुपये अखर्चित आहेत. झालेल्या विकासकामांचे दायित्व ३ कोटी ५0 लाख रुपये आहेत. त्यामुळे परत जाणारा निधी दायित्वासाठी वर्ग करण्यात यावा, यासाठी आमचे प्रय▪सुरू आहेत. त्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह जि.प. अध्यक्षा जयमाला गायकवाड यांच्यासमवेत लोकप्रतिनिधींची भेट घेऊन विनंती करणार असल्याचे ते म्हणाले. सोलापूर जिल्ह्यात जिल्हा परिषद मालकीची एकूण २६ विश्रामगृहे आहेत. या सर्व विश्रामगृहांची आपण पाहणी केली आहे. या इमारती सुरक्षित राहाव्यात, यासाठी गरज असेल तेथे संरक्षक भिंती बांधण्याचे नियोजन आहे. ज्या विश्रामगृहाच्या इमारती सुस्थितीत आहेत. परंतु त्या वापरात नाहीत त्या स्थानिक ग्रामपंचायतींना भाडे तत्वावर देण्यात येणार असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले. जि.प. मुख्यालय इमारत नूतनीकरण, विभाग नूतनीकरणासाठी एक कोटीच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. ज्या विभागाचे नूतनीकरण झाले नाही, ते व मुख्यालयाचे नूतनीकरण एकाचवेळी करण्यात येणार असल्याचे देशमुख म्हणाले. गुरुवारी झालेल्या बांधकाम समितीच्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. यावेळी वामनराव बदे, शिवाजी नागणे, ज्योती मार्तंडे, महादेव पाटील, उर्मिला पाटील उपस्थित होते.
ग्रामीण भागातील तरुण मुलांना गावातच उद्योग मिळावेत, यासाठी जि.प. च्या मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जागांवर व्यापारी गाळे बांधण्याचे आमचे धोरण आहे. या माध्यमांतून पैसा गावातल्या- गावात फिरून ग्राम जीवनास आर्थिक सुबत्ता येईल. जि.प. मालमत्तेचे संरक्षण होईल.
- बाबाराजे देशमुख,
उपाध्यक्ष, जि.प.
Post a Comment