मंगळवेढा येथील घटना
मंगळवेढा / प्रतिनिधी मुंबई येथील एका पोलीस ठाण्यात कार्यरत असणार्या एका महिला पोलीस उपनिरीक्षकास सॉफ्ट ड्रिंकमधून मादक द्रव्य देऊन तिची फसवणूक करुन विवाह केला. तसेच तिच्या आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मंगळवेढा पोलीस ठाण्यात चौघांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, मंगळवेढा तालुक्यातील एक महिला मुंबई येथील एका पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत आहे. फसवून विवाह केल्याप्रकरणी व कुटुंबास खलास करण्याची धमकी दिल्याप्रकरणी शशिकांत भारत जाधव, रविंद्र जाधव, दत्ता सावंत, सुनिल आकळे (रा.डोंगरगांव) या चौघांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. पीडित महिला पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असून, २६ डिसेंबर २0१३ रोजी फिर्यादीस राहत्या घरातून वरील आरोपीने तिला गाडीत घालून कोल्हापूर येथे नेले व गुंगी आणणारे पेय देऊन तिच्याशी शशिकांत भारत जाधव याने फसवून विवाह केला. यावेळी विवाहाचे फोटोही काढण्यात आले. नंतरच्या कालावधीत फिर्यादी ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पास झाल्यानंतर तिची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली. नाशिक येथील प्रशिक्षण संपल्यानंतर तिची नेमणूक मुंबई येथील एका पोलीस स्टेशनला झाली. १५ एप्रिल २0१५ रोजी ती किरकोळ सुट्टीवर आपल्या गावी येत असताना पुन्हा गुंगी आणणारे औषध पाजून ट्रॅव्हल्समध्ये बसवून तिला पंढरपूर येथे आणण्यात आले. तेथे लग्नात काढलेले फोटो आई-वडिलांना दाखविन व तुझ्या आई-वडिलांना खलास करेन, अशी धमकी देऊन तिला मारहाण करण्यात आली. पुढे उपचारासाठी तिला मंगळवेढा येथील डॉ. शिर्के यांच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले होते, असे दिलेल्या फिर्यादीत पीडित तरूणीने म्हटले आहे. भा.दं.वि.सं.कलम ३२८, ४२0, ३२३, ५0४, ५0६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी काळे हे करीत आहेत.
Post a Comment