0

सांगोला / तालुका प्रतिनिधी
सांगोला तालुक्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सुरु असलेली कामे चांगल्या पद्धतीने सुरु असून नदी पुनर्जीवन, विहीर पुनर्भरण, गाळ काढणे तसेच नदीजोड प्रकल्प आदी कामे लोकसहभागातून करून पाणी अडविले जाईल व या पाण्याचा उपयोग शेतकर्‍यांना आगामी काळात होईल. माण नदीस मिळणारे सर्व नाले-ओढे जिवंत करून वाहते केल्यास नदी परिसरातील लोकांना पाणीटंचाई जाणवणार नाही, असे जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी पत्रकारांशी वार्तालाप करताना सांगितले. सांगोला तालुक्यात सुरु असलेल्या जलशिवार उपक्रमांतर्गत विविध कामांची पाहणी शुक्रवारी दुपारी १.३0 वाजता रखरखत्या उन्हात जिल्हाधिकार्‍यांनी केली. या कामाची पाहणी केल्यानंतर कामाबद्दल समाधान व्यक्त केले. जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे शुक्रवारी (दि. २२) सांगोल्याच्या दौर्‍यावर होते. या दौर्‍यात जिल्हाधिकार्‍यांनी तालुक्यात मोठय़ा प्रमाणात सुरु असलेल्या जलयुक्त शिवार अभियान अंतर्गातील पाणलोट विकास कामांची पाहणी केली. त्यांच्यासमवेत तहसीलदार श्रीकांत पाटील, जिल्हा कृषी अधिकारी रफीक नायकवाडी, उपविभागीय कृषी अधिकारी शिवराज ताटे, तालुका कृषी अधिकारी अशोक मोरे, गटविकास अधिकारी राहुल गावडे, लघुपाटबंधारे अभियंता विनायक खरात, कृषी सहाय्यक, मंडल अधिकारी, गाव कामगार तलाठी, विविध शासकीय खात्याचे प्रमुख आदी उपस्थित होते. या दौर्‍यात त्यांनी य. मंगेवाडी येथे गाव ओढय़ावर लोकसहभागातून सुरु असलेल्या गाळ काढण्याच्या कामाची पाहणी केली. त्याचबरोबर गाव ओढय़ावरील व स्मशानभूमी शेजारील सिमेंट बंधार्‍याची पाहणी करुन अधिकार्‍यांना सूचना केल्या. त्यानंतर जिल्हाधिकारी मुंढे यांनी राजुरी येथे सुरु असलेल्या कंपार्टमेंट बिल्डिंग, विहीर पुनर्भरण कामाची पाहणी केली. विहीर पुनर्भरण कामाच्या तपासणीदरम्यान त्यांना निदर्शनास आलेल्या त्रुटीविषयी नाराजी व्यक्त करुन संबंधित अधिकार्‍यांना सूचना केल्या. राजुरी येथे सन २0१५-१६ या आर्थिक वर्षातील पाणलोट कंपार्टमेंट बिल्डिंग कामाचा शुभारंभ जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्या हस्ते झाला. सुमारे ६0 लाख रूपये खचरून याठिकाणी पाणलोट विकासाची कामे हाती घेतली आहेत. येत्या पावसाळ्यापूर्वी दज्रेदार कामे पूर्ण करावयाच्या सूचना जिल्हाधिकार्‍यांनी केल्या. जिल्हाधिकार्‍यांनी त्यांच्या दौर्‍यात राजुरी येथील माती नाला बंधार्‍याची पाहणी केली. यावेळी त्यांनी या बंधार्‍याच्या पिचिंगची कामे, सांधे मोड पक्की करण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी वाढेगाव येथील माणनदीच्या पात्राची पाहणी करून माणनदी भ्रमण समितीचे वैजीनाथ घोंगडे यांच्याकडून माण नदीच्या विषयी माहिती घेतली. माण नदीतील झाडे-झुडपे काढून सलग पद्धतीने गाळ काढावा, त्याचबरोबर नदी परिसरात वृक्षारोपण करुन नदी प्रदूषणमुक्त करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. या कामासाठी जिल्हा नियोजन समितीकडून पोकलेन उपलब्ध करुन दिले. या कामासाठी लोकसहभाग महत्त्वाचा असून तहसीलदारांनी ही कामे त्यांच्या पातळीवर करुन घ्यावीत, असे सांगितले. येत्या पावसाळ्यापूर्वी माण नदीपात्रातील गाळ, झाडे-झुडपे काढून प्रदूषणमुक्त करण्याचे आश्‍वासन तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी दिले.

Post a Comment

 
Top