0

सांगोला / तालुका प्रतिनिधी
शेती व्यवसाय केवळ उदरनिर्वाहासाठी न करता शेतकर्‍याने व्यवसाय म्हणून शेतीकडे पाहिले पाहिजे. वैज्ञानिक दृष्टीकोनातून शेती करताना पाणी व्यवस्थापन महत्त्वाचे असून तालुक्यात दुष्काळ कमी करण्यासाठी पावसाचे पाणी शिवारात अडवून जिरवले पाहिजे. पाण्याचे व्यवस्थापन आजच नाही केले तर येणारा काळ अडचणीचा ठरणारा आहे. येत्या काळात शेतकर्‍यांनी एकत्रीत येवून शेतीवर आधारीत उद्योग उभारले पाहिजेत असे मत जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केले. सांगोला येथील शिवपार्वती सिनेमा हॉल याठिकाणी काल शुक्रवारी निर्यातक्षम डाळिंब उत्पादकाची एक दिवशीय कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेत शेतकर्‍यांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे बोलत होते. कार्यशाळेस तहसिलदार श्रीकांत पाटील, जिल्हा कृषी अधिकारी रफीक नायकवाडी, उपविभागीय कृषी अधिकारी शिवराज ताटे, गटविकास अधिकारी राहुल गावडे, तालुका कृषी अधिकारी अशोक मोरे, अँड़ धनंजय हजारे, बाबुराव गायकवाड, संयोजक अंकुश पडवळे, आदी मान्यवर उपस्थित होते. प्रत्येक शेतकर्‍यांनी शेती व्यवसाय वैज्ञानिक दृष्टीकोनातून केली तर शेतकरी करोडपती होईल. डाळिंबाच्या उत्पादनामुळे सांगोल्याची जगात वेगळी ओळख निर्माण झाली आहे. आजच्या शेतकर्‍यांनी फक्त उदरनिर्वाहासाठी शेती न करता शेतीकडे व्यवसाय म्हणून उत्पादन वाढविण्याबरोबर आधुनिक पद्धतीने शेती केली पाहिजे. प्रत्येक पिकासाठी पाण्याचा ताळेबंद करुन पिक वाढीसाठी प्रय▪केले पाहिजे. आज जिल्हयातील ३५ साखर कारखाने असताना आपण दुष्काळी जिल्हा कसा काय म्हणून घेऊ शकतो असे मुंढे म्हणाले. आजचा शेतकरी निसर्गाच्या विरोधात जाऊन शेती करु लागला तर येणार्‍या काळात पाण्यासाठी मोठा संघर्ष होऊ शकतो. परंतु आज ज्या शेतकर्‍याकडे पाणी आहे त्यांच्याकडे प्रत्येक पिकाच्या पाण्याचे नियोजन आहे तो शेतकरी निश्‍चित श्रीमंत होणार असल्याचे मार्गदर्शन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी केले. जिल्हाधिकारी कृषी विभागाला अधिक वेळ देत आहेत हे महत्त्वाचे आहे. डाळिंबामुळे येथील लोकांचे राहणीमान उंचावले आहे. शेडनेट शेतीमुळे उत्पादन खर्चात कपात होऊन शेतकर्‍यांना फायदा होणार असल्याचे जिल्हा कृषी अधिकारी रफीक नायकवाडी यांनी सांगितले.

Post a Comment

 
Top