सोलापूर दि.25 : राज्याला कायमस्वरुपी दुष्काळापासून मुक्त करण्यासाठी राज्य शासनाने जलयुक्त शिवार ही महत्वाकांक्षी योजना सुरु केली आहे. सोलापूर जिल्ह्याने यामध्ये अतिशय चांगले काम केले आहे. यापुढेही याच गतीने काम सुरु राहिल्यास सोलापूर जिल्हा हा राज्यातला सर्वात चांगला जिल्हा होऊ शकतो, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात जलयुक्त शिवार अभियानाच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी पालकमंत्री विजय देशमुख, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीणसिंह परदेशी, आमदार सुभाष देशमुख, जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, या योजनेच्या माध्यमातून लोकचळवळ उभी रहावी ही शासनाची भूमिका होती ती सोलापुरात साकारत आहे. जिल्ह्याचे नियोजनाप्रमाणे काम झाल्यास सिंचन क्षेत्र 24 टक्क्यांवरुन 42 टक्क्यावर येईल. त्यामुळे दुष्काळी भाग पाणीदार होईल. या कामासाठी आर्थिक पाठबळ उभे करु, अशी ग्वाही देऊन सोलापूर जिल्ह्यात लोकप्रशासन, लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयाने अतिशय चांगले काम केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे व त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले.
राज्यातील सुमारे 20 हजार गावांना टंचाईचा सामना करावा लागतो. ही सर्व गावे टंचाईमुक्त व्हावीत यासाठी राज्य शासन टप्प्याटप्प्याने प्रयत्न करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून यावर्षी राज्यात सहा हजार गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियान हा उपक्रम राबविण्यात आला आहे. पुढील चार वर्षांत संपूर्ण महाराष्ट्र टंचाईमुक्त व्हावा, यासाठी नियोजन करण्यात येत आहे. राज्य शासन चांगल्या अधिकाऱ्यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहिल, त्याचबरोबर कामचुकारांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी आढावा बैठकीत दिला.
तत्पूर्वी तुकाराम मुंडे यांनी पॉवर प्रेझेंटेशनद्वारे जिल्ह्यात या मोहिमेंतर्गत सुरु असलेली कामे तसेच पूर्ण झालेली कामे यांची माहिती दिली. विहिर पुनर्भरण, कंम्पार्टमेंट बंडिंग, खोल सलग समतल चर, माती नाला बांध, पाझर तलाव, गाव तलाव, नदी-नाले-ओढे पुनर्जीवन व गाळ काढणे त्याचबरोबर भविष्यात ठिबक सिंचनाखाली येणारे क्षेत्र त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यात लोकसहभागातून झालेल्या कामांची माहिती त्यांनी मुख्यमंत्री यांना दिली.
--------------------------------
Post a Comment