0

मंगळवेढा तालुक्यात मान्सून चांगला सक्रिय झाला असून आज रविवारी मंगळवेढा शहरासह तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावली. दिवसभर रिपरिप पावसाबरोबर जोरदार पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. तालुक्यात रविवारी दिवसभर रिपरिप पावसाचा जोर कायम होता. ठिकठिकाणी या पावसामुळे नाले व बंधार्‍यामध्ये पाणी आले आहे. या पावसामुळे शेतकरी पेरणीसाठी सज्ज झाला असून पाऊस चालू असताना सर्वत्र पेरणीबाबत शेतकर्‍यातून चर्चा चालू होती. तालुक्यात आंधळगाव, लक्ष्मी दहिवडी, लेंडवे चिंचाळे, भोसे, हुन्नूर, खुपसंगी, पाठखळ, गोणेवाडी आदि भागात पावसाने चांगली हजेरी लावली आहे. बर्‍याच वर्षानंतर मृगचा पाऊस बरसल्यामुळे खरीप पिकांना तो फायदेशीर होणार असल्याने शेतकरी सुखावला आहे. शहरात दुपारच्या सुमारास हलक्या स्वरूपाच्या सरी कोसळल्या, त्यानंतर कांहीकाळ संततधार होती नंतर मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. थांबून थांबून पडलेल्या पावसामुळे मंगळवेढय़ातील खड्डेमय रस्ते पाण्याने भरले तर कित्येक दिवस गाळ न काढलेल्या गटारीत हे पाणी गेल्याने गटारी यानिमित्ताने गाळ घेवून वाहू लागल्या. पावसाळ्याच्या अगोदरच नगरपालिकेने गटारीतील गाळ काढणे आवश्यक होते. मात्र आरोग्य विभागाचा कारभार ढेपाळल्याने पंढरपूरहून मजूर आणून मंगळवेढय़ातील गटारींचा गाळ काढण्याची गरज आहे. पावसाळा सुरू झाला असला तरी पाऊस ज्या दिवशी विश्रांती घेईल त्यादिवशी तरी नगरपालिकेने गटारीतील गाळ काढला तरच गटारी वाहू लागतील व रोगराईदेखील फैलावणार नाही. अजूनही वेळ गेलेली नसून आरोग्य विभागाने झाडलोटीची कामे बाजूला ठेवून गटारीतील गाळ काढण्याच्या कामाला प्राधान्य द्यावे तसेच नगरपालिकेच्या पदाधिकार्‍यांनी तसेच त्या त्या भागातील नगरसेवकांनी योग्य त्या सुचना देवून ही कामे त्वरीत करवून घ्यावीत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

Post a Comment

 
Top