0

मंगळवेढा / तालुका प्रतिनिधी
ग्रामीण भागातील मजुरांच्या हाताला काम देऊन विकासाला चालना देणारी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेला मंगळवेढय़ासह जिल्ह्यात घरघर लागली असून केवळ प्रशासनाच्या दिरंगाईमुळे या योजनेचे काम १0 ऑक्टोबरपासून बंद आहे. त्यामुळे मजुरांचे वेतनही रखडले असून प्रशासनाचे डोळे कधी उघडणार? असा सवाल मजुरांमधून व्यक्त केला जात आहे. मजुरांच्या हाताला काम देण्याचा कायदा असतानासुद्धा या योजनेचे काम गेल्या दीड महिन्यापासून बंद आहे. शिवाय केलेल्या कामाचे वेतन दिले जात नाही तरीही प्रशासनाला याबाबत काहीच वाटत नसल्याचे दिसत आहे. या योजनेचे काम दुष्काळी मंगळवेढय़ात चांगल्या प्रकारे झाले असून यामध्ये होणारा गैरप्रकार कमी झाल्यामुळे अधिकार्‍यांची या योजनेत काम करण्याची मानसिकता कमी झाली कारण, यामध्ये आर्थीक टक्का मिळत नसल्यामुळे या योजनेत काम न केलेले बरे अशी भूमिका अधिकार्‍यांची झाल्याचे चित्र आहे. मंगळवेढा तालुक्यात रस्ते, विहीरी, शेततळी, शौचालय, गाळ काढणे आदी कामे करण्यात आली. अनेक शेतकर्‍यांच्या विहीरीला पाणी लागल्यामुळे त्यांच्या आयुष्यात चांगले दिवस आले. यामध्ये १ लाख ९0 हजार मंजूर असताना शासकीय नियमाच्या कचाट्यामुळे सव्वा लाखाच्या आसपास रक्कम मिळाली तरीही काही शेतकरी कर्जबाजारी झाले. तरीही पाणी लागल्यामुळे हे कर्ज फेडणे शक्य झाले. गेल्या दोन वर्षापासून नवीन विहीरीला मंजूरी नाही, दोन वेळा कागदपत्रे देऊन या प्रस्तावाला मंजूरी देण्याचे काम प्रशासनाने केले. मंजूरी देणार नसेल तर कागदपत्राचा नाहक त्रास लाभार्थ्याला दिलाच कसा? असा सवाल प्रस्ताव दिलेल्या शेतकर्‍यांमधून केला जात आहे. काही गावात तर गाळ काढण्याचे प्रस्ताव देण्याबाबत प्रबोधन करण्यात आले. परंतु, हे काम ६0-४0 च्या प्रमाणात बसत नसल्यामुळे ही योजना मंगळवेढा तालुक्यात कागदावरच राहीली. याबाबत प्रशासनाला कोणताही लोकप्रतिनिधी जाब विचारत नसल्याचे दिसत आहे. दि. १0 ऑक्टोबर पासून जिह्यात या योजनेचे काम बंद झालेले आहे.

Post a Comment

 
Top