0
 सलग पाच मुली झाल्यानंतर नैराश्येतून पत्नीचा खून
 पहाटे ३.३0 च्या सुमारास घडला थरार
 बोराळे गावावर शोककळा
मंगळवेढा / तालुका प्रतिनिधी
 मुलीच्या जन्माचे स्वागत करा म्हणत लेक लाडकी अभियान राबविणार्‍या सरकारकडून मुलीच्या जन्मानंतरही आर्थिक मदत देण्यात येते, असे असतानाही मुलीचा तिटकारा करणारेही कमी नाहीत. एका पाठोपाठ ५ मुलींचा जन्म झाल्याने व मुलगा होत नसल्याने झालेल्या वादातून बोराळे (ता. मंगळवेढा) येथील बाजीराव वाघमारे याने आपल्या पत्नीचा धारदार विळ्याने सपासप वार करून निर्घृण खून केला. ही दुर्दैवी घटना गुरुवार, दि. २७ नोव्हेंबर रोजी पहाटे ३.३0 वाजण्याच्या सुमारास घडली. सुशिक्षितांचे गाव म्हणून ओळख असलेल्या बोराळे गावात ही घटना घडल्याने सर्वांनाच धक्का बसला. या घटनेमुळे पाचही मुलींच्या डोक्यावरील मातृछत्र हरविल्याने त्या हंबरडा फोडून रडत होत्या. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत असून, पोलिसांनी आरोपी पतीस ताब्यात घेतले आहे.याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, बोराळे येथील दामाजी बाळू वाघमारे यांना एक मुलगा व दोन मुली आहेत. बाजीराव दामाजी वाघमारे (वय ३६) हा एकुलता एक मुलगा असून, त्याने मुलगा होत नाही म्हणून आपली पत्नी राणी बाजीराव वाघमारे (वय ३१) हिचा लोखंडी विळ्याच्या सहाय्याने खून केला. दामाजी वाघमारे यांच्या दोन मुलींपैकी एक मुलगी बोराळे येथे तर दुसरी कर्नाटकमधील इंडीमधील हत्तरगी येथे दिली आहे. आरोपी बाजीराव वाघमारे याचा दहा वर्षापूर्वी कासेगाव (ता. पंढरपूर) येथील रामचंद्र पाटलू माने यांची मुलगी राणी हिच्याशी विवाह झाला होता. बोराळे येथे बाजीराव व राणी हे दोघे सुखाने संसार करत होते. वाघमारे कुटुंबाला चार एकर बागायत जमीन आहे. आरोपी बाजीराव यास सलग पाच मुली झाल्या आहेत. तिसरी मुलगी झाल्यानंतर आरोपीने पत्नीकडे तुला मुलीच होतात, मुलगा होत नाही म्हणून कुरकूर करत तक्रार करत नाहक त्रास देण्यास सुरुवात केली होती. पहिली मुलगी मंजुळा ही साडेआठ वर्षाची आहे. तर शेवटची मुलगी मंगल ही दोन वर्षाची आहे. २६ नोव्हेंबर रोजी रात्री नेहमीप्रमाणे आरोपी बाजीराव व मयत राणी हे आपल्या खोलीत झोपले होते. त्यांच्याजवळ दोन मुली झोपल्या व तीन मुली आजी-आजोबाजवळ झोपल्या होत्या. रात्री साडेतीनच्या सुमारास आरोपी बाजीरावने मयत राणी हिला उठवून मुलाबद्दल कुरकूर करण्यास सुरुवात केली. हे भांडण वाढतच गेले. बाजीराव याने लोखंडी विळा हातात घेऊन पत्नीवर सपासप वार करण्यास सुरूवात केली. सुरुवातीला तिने हे वार हातावर घेतले. नंतरचे वार तिच्या मानेवर बसले. एक वार मणक्यावर बसला आणि अर्धी मान बाजूला झाली. प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने राणी जागीच मरण पावली. ही घटना पाहून दोन नंबरची मुलगी संजीवनी ही ओरडत आजोबांच्या खोलीत गेली, आजोबांनी जाऊन हे चित्र पाहिले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सुनेकडे पाहून त्यांनी मुलगा बाजीराव यास विचारणा केली; परंतु, पत्नीच्या खुनानंतर बाजीराव गप्प बसून होता. आजोबांनी शेजारच्या लोकांना बोलावून आणले. घटनेची वार्ता वार्‍यासारखी गावभर पसरली. तंटामुक्तीचे अध्यक्ष एस.एस. पाटील यांना माहिती दिली. पहाटे ४ च्या सुमारास मंगळवेढा पोलीस ठाण्याला खबर देण्यात आली. पहाटे सव्वाचार वाजता दामाजी वाघमारे यांनी मयताचा भाऊ तानाजी रामचंद्र माने (कासेगाव) यांना झालेल्या घटनेची माहिती दिली. तात्काळ तानाजी व त्याचा भाऊ व चुलता हे तिघे बोराळे येथे आले. राणीची आई यापूर्वीच वारलेली आहे. मयत राणी व तिच्या भावाचे एकाच मांडवात लग्न झालेले होते. माहेरच्या मंडळींना रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मुलीकडे पाहून दु:ख अनावर झाले होते. घटनेबाबत जिल्हा पोलीस प्रमुख दत्तात्रय मंडलिक, उपविभागीय पोलीस अधिकारी किशोर कारंडे यांना माहिती देण्यात आली. जिल्हा पोलीस प्रमुखांच्या आदेशाने उपविभागीय पोलीस अधिकारी किशोर कारंडे व पोलीस निरीक्षक दिलीप पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. पंचनामे केले. बोराळे येथे एम.बी.बी.एस. डॉक्टर नसल्यामुळे मरवडे येथील डॉक्टर बोलावून घेऊन शवविच्छेदन केले. मयतचा भाऊ तानाजी रामचंद्र माने यांनी मंगळवेढा पोलिसात रितसर फिर्याद दिली असून मंगळवेढा पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम ३0२ प्रमाणे बाजीराव वाघमारे याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्याला पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. शुक्रवार, दि. २८ नोव्हेंबर रोजी त्याला मंगळवेढा फौजदारी व दिवाणी न्यायालयात हजर केले जाणार आहे.

Post a Comment

 
Top