मंगळवेढा / तालुका प्रतिनिधी
विधानसभेची निवडणूक संपल्यानंतर आमदार भारत भालके हे राजकीय दृष्ट्या स्थैर्य मिळाल्यामुळे स्थूल राहतील असे वाटत होते. तर पराभवामुळे जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष प्रशांत परिचारक व शिवसेनेचे समाधान आवताडे हे 'वेट अँड वॉच'चे धोरण राबवितील अशी परिस्थिती झाली होती. परंतु, पुन्हा सर्वजण कार्यकर्त्यांपर्यत जावून आपली भूमिका मांडू लागल्याने मंगळवेढय़ात राजकीय चर्चा तापू लागली आहे.
मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांना पाठींबा देण्यावरुन राष्ट्रवादी व शिवसेनेची राजकीय भूमिका पाहता मध्यावधी होण्याची शक्यता वाटू लागल्यामुळे आ. भालकेंनी मतदारांचे आभार मानण्याच्या निमित्ताने गावभेट दौरा सुरु केला आहे. आढावा बैठका घेऊन अधिकार्यांना फैलावर घेतले आहे. अगदी सर्वसामान्यांना दिलासा मिळावा म्हणून मटका बंद करण्याचे जाहीर आदेश दिले आहेत. भाईगिरी चालणार नाही, या शब्दात अवैध धंद्याचा समाचार घेतला आहे. तर दुष्काळासाठी आलेले पैसे वाटप न केल्यामुळे तहसीलदार कोथरे यांना आढावा बैठकीत चांगलेच धारेवर धरले होते.
या पाठोपाठ प्रशांत परिचारक यांनी पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यात विश्वासू कार्यकर्त्याची बैठक घेऊन पराभवाची जबाबदारी स्वत:वर घेतली आहे. झाले, गेले विसरुन जावा, मंगळवेढा शहर व तालुका मला नवखा असताना ३५ हजार मते मिळाली आहेत. अवघी चार, पाच हजार मते कमी मिळाल्यामुळे पराभव झाला आहे. परंतू पराभवाने खचून न जाता कार्यकर्त्याला ताकद देणार, संस्था सक्षम करणार, गट प्रबळ करणार, मी लढतो तुम्ही बरोबर रहा या शब्दात त्यांनी राजकीय बांधणी पुन्हा सुरू केली आहे.
एकूणात परिचारक यांनी येणार्या सहकारी संस्था लढविण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. यामुळे परिचारक यांचा पराभव हा विषय मागे पडला असून सहकारातील बलाढय़ नेते म्हणून ओळखले जाणारे परिचारक आता पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यात पुन्हा राजकीय धुमाकूळ घालतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, उद्योजक समाधान आवताडे यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढविली. तब्बल ४१ हजार मते मिळवून त्यांनी मंगळवेढय़ातील राजकीय विरोधकांना तोंडघशी पाडले आहे. त्यांच्या स्पिनींग मिलचे काम वेगाने सुरु आहे. तो पर्यंत इतर संस्था सुरु करण्यासाठी त्यांनी प्रय▪सुरु केले आहेत. याचवेळी युवा कार्यकर्त्याला ताकद देवून सक्षम बनविण्याचे धोरण राबविण्यास सुरुवात केली आहे. यामुळे आवताडेंची संथ वाटचाल कशी असते व किती परिणामकारक असते हे विधानसभेच्या निवडणूकीच्या निकालावरुन स्पष्ट झाले आहे. आता तर त्यांच्याकडे अधिक वेळ असून ते पुर्णवेळ काम करणार असल्याने आवताडे गट या पुढील काळात पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यात प्रबळ गट म्हणून पुढे येणार असल्याचे स्पष्ट दिसू लागले आहे. एकूणात तालुक्यात आ. भालके, परिचारक,आवताडे यांचा राजकीय संघर्ष न थांबता पुन्हा तेवत राहिला आहे, असे स्पष्ट दिसू लागले आहे.
Post a Comment