मंगळवेढा / तालुका प्रतिनिधी
बोराळे (ता. मंगळवेढा) येथे वंशाला दिवा पाहिजे म्हणून राणी वाघमारे या महिलेला तिच्या पतीने बाजीराव वाघमारे याने धारधार शस्त्राने वार करुन तिचा निर्घृण खून केला. त्यांना पाच मुली आहेत. सहावा मुलगा व्हावा, अशी अपेक्षा होती. मुलगा व्हावा या हव्यासापोटी पतीने पत्नीचा खून करुन माणूसकीला काळीमा फासला. संपूर्ण महाराष्ट्र राज्यात या प्रकरणी हळहळ व्यक्त केली जात आहे. पाचही मुलींना मदत म्हणून तर बर्याच जणांनी दत्तक घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पुण्याचे उद्योगपती बाळासाहेब हगवणे-पाटील, कासेगावचे बागायतदार आबासाहेब देशमुख, मंगळवेढय़ातील स्वयंसेवी संस्थेचे चेअरमन दत्ता खडतरे, बाश्रीतील बाल किर्तनकार सौरभ मोरे यांची संस्था, इचलकरंजीचे व्यापारी, सोलापूरचे उद्योगपती कुमार करजगी यांच्यासह अनेकांनी या मुलींना दत्तक घेऊन त्यांची जबाबदारी घेण्याची तयारी दर्शविली आहे. बोराळेमधील माणूसकीला तडा गेला असला तरी पुरोगामी विचाराच्या फुले, शाहू, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात माणूसकी व वैचारिक बैठक असल्यामुळे अनेक उद्योगपती, व्यापारी, शेतकरी यांनी त्या पाच अभागी मुलींना मदत करण्यासाठी प्रतिसाद दिला आहे. दरम्यान, मयत राणी वाघमारे या गरोदर नव्हत्या शव विच्छेदनामध्ये असा कोणताही प्रकार आढळून आला नसल्याचे डॉक्टर एस.एन. माळी यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, या प्रकरणी आरोपी बाजीराव वाघमारे व त्याचे वडील दामाजी वाघमारे यांचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मयताचे भाऊ तानाजी माने यांनी केली आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment