0
 मंगळवेढा / समाधान फुगारे
 राज्य शासनाच्या शिक्षण खात्याने ऊस तोडणी कामगारांच्या मुलांना शिक्षण मिळावे म्हणून प्रत्येक साखर कारखान्यावर साखर शाळा सुरू केल्या होत्या. मंगळवेढा तालुक्यात चार साखर कारखाने आहेत. त्यामध्ये श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना, भैरवनाथ शुगर, फॅबटेक शुगर, युटोपियन शुगर हे कारखाने असून त्यामध्ये श्री संत दामाजी, भैरवनाथ व फॅबटेक हे कारखाने चालू असून युटोपियन शुगर काही दिवसातच चालू होत आहे. परंतु, यातील एकाही साखर कारखान्यावर सध्या ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी साखर शाळा अस्तित्वात नसल्याचे समजते.दामाजी सहकारी साखर कारखान्याने गेल्या ३ वर्षापूर्वी साखर शाळा बंद केली आहे. ऊसतोड मजूरांची मुले शिक्षण मिळावे यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये जाऊन शिक्षण घेत आहेत. भैरवनाथ शुगर येथे साखर शाळा उभारण्यात आली असून त्यामध्ये विद्यार्थी नसल्यामुळे साखर शाळा बंद अवस्थेत आहे तर फॅबटेक कारखान्यामध्ये लमाणतंडा येथील जिल्हा परिषेदच्या शाळेमध्ये ऊसतोड मजुरांची मुले शिक्षण घेत आहेत. एकीकडे सर्व शिक्षा अभियान या योजनेखाली सर्वांना शिक्षणाची दारे खुली करणार्‍या शासनाने गतवर्षीपासून साखर शाळा बंद करण्याचे धोरण स्वीकारले. या शाळा बंद करून ऊसतोडणी कामगारांच्या मुलांना नजिकच्या जिल्हा परिषद शाळेत शिक्षणाची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक साखर कारखान्यावर साखर शाळेत शिक्षण घेणार्‍या मुलांची संख्या ही ३00 ते ३५0 च्या सुमारास आहे. या सर्व विद्यार्थ्यांना जिल्हा परिषेदच्या शाळेत सामावून घेणे तसे शक्य नाही. तसेच या मुलांवर असलेल्या जबाबदारीमुळे जिल्हा परिषेदच्या शाळेत जाऊन शिक्षण घेण्याची मानसिकता या विद्यार्थ्यांच्या पालकांमध्येही दिसून येत नाही. कारण, ऊसतोडणी कामगारांच्या मुलांवर घरची जबाबदारी मोठी आहे. आई-वडील दिवस-रात्र काम करत असतात. त्यांच्या पाठीमागे शिक्षण घेणार्‍या मुलांना शिक्षणाबरोबर घरही सांभाळावे लागते. तालुक्यातील साखर शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत असून त्यांच्या होणार्‍या नुकसानीस कोण जबाबदार? असा प्रश्न उपस्थित होत असून शासनाने पुन्हा साखर शाळा सुरू कराव्यात, अशी मागणी सर्व ऊसतोड मजुरांमधून होत आहे.             

Post a Comment

 
Top