0
पंढरपूर / प्रतिनिधी 


विधीमंडळात झाली आ.भालके यांच्या लक्षवेधी सूचनेवर चर्चा  
मंगळवेढा तालुक्यातील कायम दुष्काळी ३५ गावांच्या उपसा सिंचन योजने बाबत सदर प्रकल्पाच्या प्राथमिक आवश्यक वैधानिक मान्यतेसाठी येणार्‍या खर्चाच्या अनुषंगाने महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाने निधीची मागणी केली आहे. सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने महामंडळाकडून कांही अतिरिक्त माहिती मागविण्यात आली आहे. सदर माहिती प्राप्त होताच महामंडळाच्या मागणीनुसार प्रथम टप्यातील वैधानिक मान्यता प्राप्त करण्याच्या कामासाठी आवश्यक असलेला निधी मागणीचे अनुषंगाने उचित कार्यवाही करण्यात येणार असल्याचे ठोस आश्‍वासन जलसंपदा मंत्री ना. महाजन, जलसंपदा राज्यमंत्री ना. शिवतारे यांनी दिली आहे. सोमवार दि. २२ डिसेंबर रोजी विधानसभेच्या सभागृहात मंगळवेढा तालुक्यातील कायम दुष्काळी ३५ गावांच्या उपसा सिंचन योजने बाबत पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघाचे आमदार भारत भालके यांनी दिलेल्या लक्षवेधी सूचनेवर जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन व जलसंपदा राज्यमंत्री ना. विजय शिवतारे यांनी निवेदन करताना वरील माहिती दिली. सदर लक्षवेधीवर चर्चा घडवून आणताना आमदार भारत भालके यांनी या दुष्काळी ३५ गावच्या भागातील शेतकर्‍यांनी मोर्चे, आंदोलने, निवडणुकीत मतदानावर बहिष्कार तसेच आम्हाला महाराष्ट्रातून काढून कर्नाटकात घाला म्हणणे, अनेक शेतकरी कुटूंबाचे स्थलांतर होणे या सर्व घटना अत्यंत आक्रमकपणे मांडून या ३५ गांवातील दुष्काळाची भीषणता सभागृहाच्या निदर्शनास आणून दिल्यावर सांगोला विधानसभा मतदार संघाचे ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख यांनी चर्चेत भाग घेऊन आ. भालके यांनी त्या ३५ गांवची दुष्काळाची भीषणता जी मांडली आहे ती अत्यंत भयावह आहे. त्यामुळे ना. मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की, सदर विषयाचा अत्यंत गांभीर्यपूर्वक विचार करून या सिंचन प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून द्यावा असे म्हणून या लक्षवेधीला पाठिंबा दिला. तसेच आमदार अजित पवार, आमदार सुभाष देशमुख, आमदार जयप्रकाश मुंदडा यांनी सदर लक्षवेधीच्या चर्चेत भाग घेऊन मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या निधीबाबत सभागृहात आग्रही भूमिका मांडली.

Post a Comment

 
Top