0

तुका म्हणे तुम्ही विचारांचे ग्रंथ। तारिले पतित तेणे किती।।’ खुद्द तुकोबाराय ज्यांच्याबद्दल असे म्हणतात, ते पतितांना तारणारे व उपेक्षितांची र्कैफियत देवापुढे तळमळीने मांडणारे संत. शहराच्या अगदी मध्यभागात संत चोखामेळा यांचे समाधी मंदिर आहे
इतिहास
संत चोखामेळा हे प्रापंचिक गृहस्थ. ते उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी करत, पण ते विठ्ठलाच्या नामात सतत दंग होते.त्यांच्या कुटुंबातील सर्वच जण हरिभक्ती परायण होते. त्या सर्वांचे श्रीविठ्ठलावर अनन्यसाधारण प्रेम होते. त्यांची पत्नी सोयराबाई हिचे बाळंतपण स्वत: विठाई माऊलीने नणंदेचे रूप घेऊन केले अशी कथा प्रचलित आहे. संत चोखोबांचा मुलगा कर्ममेळा हा पण संत परंपरेत आहे. सोयराबाई व कर्ममेळा यांच्याही काही सुंदर अभंग- रचना आहेत. संत चोखोबांचे मेव्हणे बंका महार व बहीण निर्मळा यांच्याही काही उत्तम रचना आहेत. संत चोखोबांच्या भक्तीची उंची फार मोठी होती. ते स्वत:ला ‘विठू पाटलाचा बलुतेदार, म्हणून समजत असत. गावगाड्यातील शिवाशिवीच्या वातावरणात त्यांचा श्र्वास कोंडला जात होता. दैन्य, दारिद्रय, र्वैफल्य यांमुळे ते लौकिक जीवनात अस्वस्थ होते.
कर्मभूमी
संत चोखोबांचे भावविश्र्व अनुभवण्याचा प्रयत्न केला असता, एक मूक आक्रंदनाचा अनुभव येतो. संस्कारसंपन्न,संवेदनक्षम,भक्तिप्रवण, आत्मनिष्ठ व्यक्तिमत्त्वाच्या चोखोबांच्या रचनांतून, त्यांच्या आंतरिक वेदनांचे सूर छेडलेले जाणवतात. ‘हीन मज म्हणती देवा। कैसी घडो तुमची सेवा।’ असा उपरोधिक प्रश्र्न ते देवालाच विचारतात. ‘का म्हणून आम्ही या यातना सहन करावयाच्या, भगवंताच्या लेखी सर्व त्याचीच लेकरे आहेत ना, मग असा दुजाभाव का?’ असे प्रश्र्न त्यांच्या मनात निर्माण होऊन ते व्यथित होताना दिसतात. त्यांच्या अभंगरचना हृदयाला भिडणार्‍या आहेत. त्यांना भोगावे लागलेले दु:ख, त्यांची झालेली अक्षम्य उपेक्षा, मानसिक छळ याचे पडसाद भावविभोरतेसह त्यांच्या काव्यरचनेत अभिव्यक्त झालेले दिसून येतात. संत चोखोबांचे सुमारे ३५० अभंग आजच्या घडीला उपलब्ध आहेत. त्यांचे अभंग लिहून घेण्याचे काम ‘अभ्यंग अनंत भट्ट’ हे करत असत, असा उल्लेख काही संशोधक करतात. ‘धाव घाली विठु आता। चालू नको मंद। बडवे मज मारिती। ऐसा काही तरी अपराध।।’ ‘जोहार मायबाप जोहार। तुमच्या महाराचा मी महार। बहु भुकेला जाहलो। तुमच्या उष्ट्यासाठी आलो।।’ ‘आमुची केली हीन याती। तुज कां न कळे श्रीपती। जन्म गेला उष्टे खाता। लाज न ये तुमचे चित्ता।।’ ‘ऊस डोंगा परि । रस नोहे डोंगा। काय भुललासी वरलीया रंगा।। चोखा डोंगा परि। भाव नोहे डोंगा।।’ ‘विठ्ठल विठ्ठल गजरी। अवघी दुमदुमली पंढरी।’ चोखामेळा हे मुळचे बुलढाणा जिल्ह्यातील मेहुण या गावंचे रहिवाशी. ते उदरनिर्वाहासाठी पंढरपूरी शके १२०० साली आले. पंढरपूरी आल्यानंतर त्यांना विठठल भक्तीत दंग झाले. ते सदैव पांडुरंगाचे नामस्मरणात व भजनात रंगून जायचे. त्यावेळी मंगळवेढे नगरी भरभराटीस आली होती. शके १२६० ला मंगळवेढ्यातील वेशीच्या तटाची भिंत कोसळली होती. व तिचे बांधकाम करण्यासाठी पंढरपूरचे मजूर आणण्यासाठी दूत पंढरपूरी आला. आणि त्या मजुरासोबत चोखामेळा तटाच्या भिंतीचे बांधकाम करण्यासाठी सहकुटुंब मंगळवेढ्यास आले . किल्ल्याच्या पूर्वेकडील वेशीचे बांधकाम चालू असता ते एकाएकी कोसळले व त्याखाली श्री चोखोबाराया आणि अनेक मजूर मयत झाले ही घटना शके १२६० म्हणजे इ.स. १३३८ मध्ये वैशाख वद्य पंचमीस झाली. पुढे श्री संत नामदेव महाराज हे मंगळवेढ्यास आले व ज्या अस्थिमधून विठ्ठ्ल विठ्ठ्ल असा आवाज होता त्या अस्थि श्री चोखोबारायांच्या आहेत असे ओळखून त्यांनी त्या पंढरपूरी विठठल मंदिरापुढे सध्या नामदेव पायरी जवळ समाधी बांधली

Post a Comment

 
Top