जिल्हय़ात सर्वत्र नाकाबंदी
संतप्त ग्रामस्थांनी प्रेत मंगळवेढा पोलीस ठाण्यासमोर ठेवले
लक्ष्मीदहिवडी येथील रामेश्वर बापूराव जुंदळे (वय ३६) यांची अज्ञात ४ हल्लेखोरांनी दुपारी १२.३0 वाजता डोक्यात तीन गोळ्या झाडून निर्घृण हत्या केली. भरदिवसा गोळ्यांच्या आवाजाने या परिसरात खळबळ उडाली.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, लक्ष्मीदहिवडी येथील ग्रामपंचायतीचे माजी सदस्य रामेश्वर जुंदळे हे असून, त्यांचा ट्रॅक्टर व जेसीबी भाड्याने देण्याचा व्यवसाय आहे. ते आपल्या कुटुंबासह लक्ष्मीदहिवडी गावापासून दीड किलोमीटर अंतरावर राहात होते. जुंदळे हे गावात कामानिमित्त सकाळी लवकर आले होते. गावातील कामे आटोपून घरी जात असताना विमा प्रतिनिधी त्यांना भेटले, त्यावेळी विम्याच्या कामासाठी कांही कागदपत्रांची मागणी त्यांनी केली असता ती कागदपत्रे आणण्यासाठी त्या विमा एजंटची हिरो होंडा (क्र. एम.एच-१३, ए.यु.-९१३४) ही गाडी घेऊन घरी गेले होते. कागदपत्रे घेऊन गावाकडे येत असताना वस्तीजवळ काही अंतरावर दोन मोटार सायकलवर आलेल्या चौघा अज्ञात व्यक्तींनी रामेश्वर जुंदळे यांच्या डोक्यात तीन गोळ्या घालून त्यांची निर्घृण हत्या केली. मोटार सायकलवरून आलेल्या या चौघांच्या गाड्यांना नंबरप्लेट नव्हती.
दरम्यान, घटनास्थळापासून काही अंतरावर राहणारा त्यांचा शेजारी संतोष हा तेथे पळत आला. त्याला गोळ्या झाडल्याचा आवाज आल्याने तो जेवण सोडून बाहेर पळत आला असता त्याला हल्लेखोर पळून जाताना दिसले. तेव्हा हे हल्लेखोर मोटार सायकलवरून चाळीसधोंडा राजापूरच्या दिशेने गेल्याचे त्याच्या दृष्टीपथास आले
पोलीस ठाण्यासमोर नातेवाईकांचा आक्रोश
लक्ष्मीदहिवडी येथील मनमिळावू व्यक्तिमत्व म्हणून रामेश्वर जुंदळे यांना ओळखले जात होते. खुनानंतर त्यांचे प्रेत पोलीस ठाण्यासमोर आणले. त्यावेळी त्यांचे नातेवाईक, मित्रांनी एकच आक्रोश केला. ते पाहून उपस्थित लोकांना हुंदके आवरता आले नाहीत. त्यावेळी मंगळवेढय़ाचे युवा उद्योजक समाधान आवताडे यांनी उपस्थित लोकांचे सांत्वन करत त्यांना शांत राहण्याचे आवाहन करत पोलिसांना तपास कामात मदत करण्यासाठी सगळ्यांना आवाहन करत असताना दिसून आले.
Post a Comment