0

पंढरपूर : लक्ष्मीदहिवडी ता. मंगळवेढा येथील उद्योजक रामेश्‍वर बापू जुंदळे यांच्या खून प्रकरणातील प्रमुख मुख्य सूत्रधार लक्ष्मण दत्तात्रय जुंदळे याचा जामीन अर्ज पंढरपूरचे अतिरिक्त सत्र न्या यु. एम. मुधोळकर यांनी फेटाळून लावला. लक्ष्मी दहिवडी येथील रामेश्‍वर जुंदळे यांचा २७ जून रोजी दुपारी गोळ्या घालून खून करण्यात आला होता. याबाबत मंगळवेढा पो.नि. सालार चाऊस, गुन्हे शाखा, सायबर क्राईम यांनी तपास करून कर्नाटकातील शॉर्पशूटरसह साथीदारांना अटक केली आहे; मात्र सदरचा खून हा सुपारी देऊन केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने पोलिसांनी मुख्य सूत्रधार लक्ष्मण दत्तात्रय जुंदळे यास अटक केली आहे. या प्रकरणात जामीन मिळावा म्हणून त्याने अर्ज दाखल केला होता. सुनावणी दरम्यान मूळ फिर्यादीच्या वतीने अँड. शशी कुलकर्णी यांनी युक्तिवाद करण्याची मागितलेली परवानगी न्यायालयाने मंजूर केली होती. यानुसार अँड. शशी कुलकर्णी यांनी गुन्ह्याचे स्वरूप गंभीर आहे. आरोपीने सुपारी देऊन खून केलेला आहे. गुन्हे शाखेच्या तपासात आरोपीने गुन्हा केल्याचे उघड झाले आहे. यामुळे सध्या तपास महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. यामुळे आरोपीस जामीन दिल्यास तपासात अडथळा निर्माण होणार आहे. तिन्ही वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरीत न्या. मुधोळकर यांनी गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे, प्रथमदर्शनी आरोपीचा सहभाग दिसत आहे, त्यामुळे आरोपी जामिनावर सोडण्यास पात्र नाही असे निरीक्षण नोंदवत आरोपीचा जामीन फेटाळला. यात मूळ फिर्यादीतर्फे अँड. शशी कुलकर्णी, अँड. आर.डी.पोरे, अँड. अभिषेक गुंड, अँड. गुरुदत्त बोरगावकर, अँड. देवदत्त बोरगावकर, अँड. स्वप्निल सरवदे, तर सरकारतर्फे अँड. ए.डी.भोसले यांनी काम पाहिले

Post a Comment

 
Top