कराड / प्रतिनिधी
आपणाला दिल्लीला जाण्यात आता रस राहिला नसून यापुढील काळात आपण राज्यात राहून कराडच्या चौफेर विकासासाठी सरकारमधून आणि बाहेरूनही प्रय▪करणार असल्याची माहिती राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि नवनिर्वाचित आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. कराड येथील निवासस्थानी दीपावलीनिमित्त पत्रकारांसमवेत फराळ कार्यक्रमात गप्पा मारताना ते बोलत होते. यावेळी आ. आनंदराव पाटील यांची उपस्थिती होती. राज्यातील काँग्रेस पक्षाच्या निराशाजनक कामगिरीचा आढावा घेण्यासाठी पक्षाच्या विधिमंडळ सदस्यांची बैठक दीपावलीनंतर दि. २७ अथवा २८ रोजी होणार असल्याचे सांगून ते म्हणाले, कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाची निवडणूक ऐतिहासिक झाली असून या निवडणुकीबद्दल लोकांमध्ये मोठे कुतूहल होते. आपण मुख्यमंत्री असताना कराड शहर व तालुक्याच्या विकासासाठी मोठय़ा प्रमाणात निधी आणला असून या पुढील काळातही सरकारच्या माध्यमातून निधी आणण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. आपण निवडणुकीनंतर दिल्लीला जाणार असल्याच्या वावड्या उठवल्या होत्या, मात्र आपण दिल्ली नव्हे तर राज्यात राहणार असून कराड व मुंबई हे आपले कार्यक्षेत्र राहणार असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. आ. चव्हाण म्हणाले, सन १९९९ नंतर आपण राज्यसभेत सदस्य झालो. त्यानंतर केंद्र सरकारमध्ये विविध जबाबदार्या सांभाळाव्या लागल्यामुळे कराडशी म्हणावा तितका संपर्क राहिला नव्हता, मात्र यावेळी मी कराड दक्षिण मतदार संघातून निवडून आल्यामुळे या पुढील कालावधीत नियमित माझा कराडशी संपर्क राहणारआहे. दीपावली पाडव्यापासून मतदार संघात संपर्क मोहीम सुरू करण्यात येणार आहे. राज्यात अजूनही अस्थिर परिस्थिती राहिली आहे. त्यामुळे सरकार कोणाचे बनणार, यावर बरेच काही अवलंबून आहे. काँग्रेस पक्षाने विरोधी पक्ष म्हणून काम करण्याची भूमिका घेतली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीनंतर औपचारीक गप्पा मारताना जी चर्चा झाली तिचे रूपांतर मुलाखतीत करून प्रसिध्द करण्यात आले. त्यामुळे आपण न बोललेले मुद्देही त्यामध्ये समाविष्ठ करण्यात आले. परिणामी त्याचा माझ्या सहकार्यांना त्रास झाला. मुलाखतीनंतर आपण दिलगिरी व्यक्त केल्याचे सांगून ते म्हणाले, मला जर कोणाविषयी बोलायचे असते तर परराज्यातील इंग्रजी दैनिकाला मुलाखत देण्याऐवजी राज्यातील प्रमुख वृत्तपत्रांना दिली असती, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. 'एमआयएम'सारख्या धार्मिक आधारावर काम करणार्या पक्षाचा राज्याच्या राजकारणात झालेला शिरकाव ही गंभीर बाब असल्याचे आ. चव्हाण यांनी सांगितले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment