विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती आले असून अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात छोट्या, प्रादेशिक पक्षांची लोकप्रियता कमालीची घसरली आहे. यामुळे छोट्या प्रादेशिक पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला असून अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात मनसे व्यतिरिक्त कोणत्याच छोट्या, प्रादोशिक पक्षाला जनाधार नसल्याचे समोर आले आहे. यामुळे भविष्यकाळात प्रादेशिक पक्षांना लोकप्रियता व जनाधार मिळविण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात एकूण ११ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. कांॅग्रेस, भाजपा या राष्ट्रीय पक्षांव्यतिरिक्त शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, रासपा, एमआयएम, मनसे या पक्षांनीही आपले उमेदवार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरविले होते. यामुळे विधानसभा निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली होती. छोट्या प्रादेशिक स्तरावर काम करणार्या पक्षांमुळे राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवारांसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते. प्रादेशिक पक्षांच्या मत विभागणीमुळे कॉंग्रेस, भाजपाची मते फुटणार अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. पण विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मात्र तसे काहीच वाटले नाही. प्रादेशिक, छोट्या पक्षाच्या दाव्यांचा फुगा मतमोजणीनंतर फुटला. छोटा पक्षांच्या उमेदवारांचे दावे हे गळून पडले. त्यांची खरी ताकत स्वबळ हे मतदारराजांनी दाखवून दिली. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात मनसेच्या उमेदवारांनी २0 हजार ४५१ मते मिळविली आहेत. या पक्षाचा संदर्भ सोडला तर शिवसेनेला १ हजार ६0७, एमआयएमला १ हजार ६४२, राष्ट्रवादी कॉंग्रेसला १ हजार ५१६, बसपाला ३ हजार ८९१ इतकीच मते मिळाली. यावरुन या पक्षांची अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील ताकत दिसून येते. अक्कलकोट तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसची मोठी ताकत असतानाही राष्ट्रवादी कांॅग्रेसच्या उमेदवाराला एखाद्या वॉर्ड निवडणुकीतील मते मिळाली, ही पक्षाला अत्यंत विचार करायला लावणारी बाब आहे. शिवसेना, बसपा यांचीही कामगिरी तशी निराशाजनकच म्हणावी लागणार आहे. या पक्षांची असणारी 'क्रेझ' मात्र मते खेचून घेण्यात उपयोगाला आली नाही. मनसे व्यतिरिक्त इतर छोट्या प्रादेशिक पक्षांनी मते मिळविण्यात अपयशी ठरल्याचे निकालावरुन दिसत आहे. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात छोट्या प्रादेशिक पक्षांची सद्दी संपण्यात आली असून यापुढील काळात केवळ राष्ट्रीय पक्षांची चलतीच अक्कलकोट तालुक्यात राहणार आहे, असे एकूणच निकालावरुन दिसत आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment