मंगळवेढा / तालुका
प्रतिनिधी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात आ. भारत भालके यांना दणदणीत यश मिळाले. या यशात मोहिते-पाटील सर्मथकांचे योगदान महत्वपूर्ण ठरले आहे. मोहिते-पाटील व परिचारक यांच्यात गत विधानसभेनंतरची अंतर्गत सुंदोपसुंदी जगजाहीर होती. मोहिते-पाटील यांनी परिचारक यांना पराभूत करण्यासाठी आपली सगळी ताकद कॉंग्रेसचे आ. भालके यांच्या पाठीशी उभा केल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. पंढरपूर शहरातील अनेक नेते कार्यकर्ते यांनी परिचारक यांना सोडून आ. भालकेंच्या तंबूत उडी घेतली. यामुळे परिचारक यांच्या बालेकिल्ल्यातच आ. भालकेंनी मोठा धक्का दिला. मंदिर परिसर वगळता परिचारक यांना पंढरपूर शहरातच अपेक्षित मतदान झाले नाही. परिचारक यांना सुमारे १0 ते १५ हजाराचे मताधिक्य पंढरपूर शहर व २२ गावातून अपेक्षित होते. परंतू त्या ठिकाणी आ. भालके व परिचारक यांच्यातली कुस्ती काठावर सुटली. दमलेल्या परिचारक यांना मंगळवेढय़ात कुस्तीच करता आली नाही. यामुळे मंगळवेढय़ात आ. भालके विरुद्ध आवताडे अशी चुरस रंगली. शहरात आवताडे अग्रेसर ठरले तर ग्रामीण भागात आ. भालके आघाडीवर राहिले. एकूणात आ. भालकेंना मोहिते-पाटील व माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळेंचे सहकार्य आमदारकी मिळवून देण्यासाठी अतिशय मोलाचे व उपयोगी ठरले आहे. यामुळे आ. भालकेंना आमदारकी मिळविणे शेवटच्या टप्प्यात सोपे झाल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment