0

ती घटना आठवली की अजूनही अंगाचा थरकाप सुटतो..कारण ती घटनाच तशी होती. ज्यांना तळहातावरील फोडासम आपण जपतो तीच व्यक्ती जर अगदी आपल्याच नजरेसमोर नष्ट होणार असेल, तर त्यास काय म्हणावे.? मुळात हे न उलगडणारं निसर्गाचं कोडंच म्हणावं लागेल. न राहून अनेकदा प्रश्न निर्माण होतो, त्या नियतीला तरी काय हवं असतं.? का बरं तिनं एवढं एखाद्याला भंडाऊन सोडावं...? कितीही आयुष्य बर्बाद केली तरी तिचा गुंता काही केल्या सुटत नाही. नव्हे त्या नियतीचं गणितचं मोठं किचकट अन् तेवढंच अवघड़ सूत्रं कोणतीही वापरा ती न जुळणारीच. मग अशा गुंतागुंतीच्या कोड्याचा दोष तरी कुणाला द्यायचा?... मग सुरू होतात आरोप-प्रत्यारोपाचे फेरे...पूर्व जन्मीचं पाप...पूर्वजांनी केलेल्या कृत्यांचे पश्‍चाताप.. कुण्या पिढीचे पाप कुण्या पिढीला भोगावे लागणारे त्याचे परिणाम...अशी एक नाही अनेक दुषणं देत आला दिवस, आली संकटं अगदी निमुटपणे सहन करण्यापलिकडं उरतयचं काय आपल्याकडे?...होय, याचं उत्तर काय..तर कधी न मिळणारं...शोधूनही न सापडणारं! होय, या दु:ख निवारणासाठी(सत्याच्या शोधात) राजपूत्र सिध्दार्थ गौतमालाही गृहत्याग करावा लागला होता. म्हणूनच अखेर महाकारूणिक तथागत सिध्दार्थ गौतम बुध्दालाही 'मृत्यू' हेच जीवनाचं अंतिम सत्य असल्याचं मान्य करावं लागलं. हे जरी खरं असलं तरी एखाद्याच्या वाट्याला एवढी क्रुरता का बरे यावी.? मी हे सर्व मांडतोय ते सुमारे १५ ते १६ वर्षांपूर्वी घडून गेलेल्या एका वास्तवतेची कहाणी. कदाचित कुणाला वाटेल की, कशाला उगाच उकरत बसलात ते मढं. हे सत्य आहे. कारण, आजही ती घटना न राहून आठवली की, कसं अस्वस्थ होतंय. मन सैरभैर झाल्यागत भन्नाट सुटते..पुढे रक्तबंबाळ होते...खोल जखमांनी..कधी न भरून निघणार्‍या अश्‍वथाम्याच्या भळभळणार्‍या जखमेसारखं. काय करावं क्षणभर काही सुचतच नाही...का? तर एखादं वारूळ जसं मुग्यांनी व्यापावं तसं डोकंही अगणिक प्रश्नांनी व्यापलंय. अनेकदा वाटतंय काय दोष त्या अभागीचा? असा तिने कोणता बरे गुन्हा केला असावा की, तिच्या नशीबी ही क्रुरता यावी, एवढा अमानुष्य छळ तिला सहन करावा लागावा. एवढं सारं घडूनही का बरे तिने आई वडिलांना चकार शब्दाने सांगितलं नाही. हो...तारीख नक्की जरी आठवत नसली तरी कडाक्याच्या थंडीचे अर्थातच हिवाळय़ाचे दिवस होते. त्या रात्रीचे साधारण नऊ वाजलेले असतील. अचानक मित्राचा निरोप आला, मी काही बोलण्याच्या आतच समोरची व्यक्ती बोलू लागली. घडलेला प्रकार हवेची झुळूक सुटावी तसा कानी पडला.नेमकं झालयं तरी काय? काहीच कळायला मार्ग नव्हता. मग सुरू झाली शंकेची पाल चुकचुकायला. परंतु, शंका शेवटी खरी ठरली. पाहता पाहता भूतकाळ नजरेसमोर आला. मग सुरू झाली तिच्या आजपर्यंतच्या आयुष्यभराची मांडणी. तिने रंगवलेल्या भावी आयुष्याची स्वप्न...खरंतर तिच्या घरची परिस्थिती तशी बेताचीच. घरात आठराविश्‍व दारिद्रय़...कुटुंबात चार तोंडे खाणारी...तरी आई-वडिलांची ती लाडकी लेक. मोठीचं कधीचं लग्न झालेलं. ही दुसर्‍या क्रमांकाची. जणू काही एका खात्यापित्या ऐश्‍वर्य संपन्न अशा कुळातील. दिसायला सुंदर, गोरी गोमटी जणू काही लाजाळूच.इतकी कोमलता आणि शालिनता होती तिच्या अंगी. जसंजस वय वाढत गेलं तसंतस ती अधिकच खुलून दिसायची. कार्तिक/ मार्गशिषच्या दवबिंदुनी जसा गुलाब बहरून जावा तसं तिचं सौदर्य अधिकच उठून दिसत होतं. पाहताक्षणी कुणीही तिच्यावर भाळावं असंच तिचं रुपडं. तरीही तिने कधी आपल्या सौंदर्यांवर गर्व केला नाही. सर्वजण तिला लाडाने फिजा (अर्थात पानगळ) म्हणून हाक मारायचे. तिचं सौदर्य पाहून घरी येणारा प्रत्येक पाहुणा तिच्या लग्नासाठी आईवडिलांना साकडे घालायचा. परंतु, आई वडिल नेहमी म्हणायचे 'पाहूणं, तुमचं खरंय पण अद्याप तरी आमची तयारी नाही. कारण, वर्षभरापूर्वीच मोठय़ा मुलीचं उरकलं. आता तोंडंभरणचं मोठं अवघड जातयं, तरी तिचं वय अजून झालयंच कुठं, पाहू पुढ.े..'असे म्हणून वेळ टाळून न्यायचे. हा प्रकार तब्बल दोन एक वर्ष चालला. प्रत्येक ठिकाणचं मागणं यायचं, परंतु, मनासारखं स्थळ मात्र मिळत नव्हतं. कारण, कुणा आईवडिलांना वाटतयं की, माझी मुलगी सुखात नकोय. होय, परिस्थिती कितीही हलाकीची असली तरी तिच्यासाठी कायपण करण्याची कुटुंबाची तयारी असते. केवळ माझी लाडकी लेक दिल्या घरी सुखी, समाधानी असावी एवढंच काय त्या अपेक्षाचं ओझं. आणि याच अपेक्षेनं आपल्या लाडक्या फिजाला त्यांनी एका दुरच्या नात्याच्या दावणीला बांधलं. प्रथमत: मुलीचं सौंदर्य पाहुन मुलासह कुटुंबाने कसलीही अपेक्षा केली नाही. आम्हाला तुमचं काहीचं नको, केवळ हवी ती मुलगी. भीष्म प्रति™ोच्या या एकाच वाक्यावर आडून बसलेल्या मुलाच्या कुटुंबीयांनी मुलीला लागलीच मागणी करत तयारी केली. अखेर मुलीच्या आईवडिलांनाही आपली मुलगी एका सधन कुटुंबात जात असल्यानं मोठा हर्षाेल्हास झाला. पण नियतीच्या मनात काही औरच होते. या सधन कुटुंबातच राक्षसी वृत्ती असेल हे कुणाच्याही गावी नव्हते. अखेर लग्न झालं. दिल्या घरी पाठवणी झाली. लाडाचा अन् सधन कुटुंबातला जावई म्हणून मुलीकडील मंडळींनी आपल्या ऐपतीप्रमाणे यथोचित पाहुणचार केला. मुलगी सासरी गेली. पहिली चार सहा महिने गुन्या गोविंदाने राहू लागले. जसा एखाद्या शिंपल्यात मोती चमकावा तसा सुखी संसाराच्या बहरलेल्या या वेलीवर कळीची चाहुल लागली. पाहता पाहता मुलीच्या कुटुंबात आनंदाला पारावार उरला नाही...! अचानक कुणाची दृष्ट या भरल्या संसाराला लागली कुणास ठाव. अचानक एके दिवशी निरोप आला. मामा, फिजा आजारी आहे. तुम्हाला यावं लागेल... फक्त हाच शेवटचा अन् अंतिम निरोप ठरला. कारण, तिला ना कसला आजार ना तिने तशी कधी तक्रार केलेली. इकडे आईवडिलांसह सर्वचजण चिंतेत...शेवटी निरोप आला आता ती जास्त गंभीर आहे. तिला घेऊन आम्ही तुमच्याकडे निघालोय..एकदाची रुग्णवाहिका आली. पोलिसांना पाचारण करण्यात आलं...पोलिसांनी कसाबसा आहे त्याच अवस्थेत फिजाचा जबाब घेतला...अखेर सत्य बाहेर आलं. ती साधारणत: चार-पाच महिन्यांची गरोदर होती. त्याच अवस्थेत सासरच्यांनी तिला संपवलं होतं. जाळलं होतं. का? तर सासरच्यांना हाव होती ती धनाची...अगदी लग्न झाल्यापासून ते तिच्याकडे सतत पैशाची मागणी करायचे...सतत तिचा शारीरिक, मानसिक छळ करायचे...अनेकदा तिला उपाशीपेटी दिवस काढावे लागायचे...तरीही तिच्या अंतर्मनात लागलेली आग कधी आईवडिलांना कळू दिली नाही. अखेर ती आतल्या आत कुढत होती. झिजत होती. तरीही आग विझवत होती. अखेर ती संपली, पण स्वत:ला लागलेल्या आगीची झळ कधी कुणाला पोचू दिली नाही. एवढंच काय, शेवटी मृत्युच्या सरणावर असतानाही तिनं जन्मदात्यांचे उपकार विसरले नाहीत. शेवटी म्हणाली, 'आईबाबा, जो झाला तो माझा इथपर्यंतचा प्रवास समजावा. मी या जगात आलेली एक वाटसरू ठरले. कारण, प्रवासाला अंत नसला तरी माणसाच्या आयुष्याला कुठेतरी अंत आहे.'असं म्हणत तीने अखेर या जगाचा निरोप घेतला. त्यावेळी वाजले होते पहाटेचे पावणे चार.

Post a Comment

 
Top