बळीराजा शेतकरी संघटनेची मागणी
पंढरपूर / शहर प्रतिनिधी
जळालेले विजेचे ट्रान्सफॉर्मर महावितरणने २४ तासाच्या आत दुरूस्त करून द्यावेत, ट्रान्सफॉर्मरची वाहतूक कंपनीच्या वाहनाने करावी, निकृष्ठ विद्युत वाहिन्या बदलून मिळाव्यात अशा विविध मागण्या बळीराजा शेतकरी संघटनेने लेखी निवेदनाद्वारे केल्या असून यासाठी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. ग्रामीण भागात ट्रान्सफॉर्मर जळण्याचे प्रमाण वाढले असून शेतकर्यांच्या पिकांचे नुकसान होवू लागले आहे. यासंदर्भात बळीराजा शेतकरी संघटनेचे माऊली हळणवर, नितीन बागल, संग्राम गायकवाड, ज्ञानेश्वर जवळेकर, पंडित बागल, मनोज फाटे, पंजाबराव भोसले, अंकुश भुईटे, राजेश काकडे, सोमनाथ ढोणे, सोमनाथ घोगरे, गोपाळ पाटील आदींनी येथे महावितरण कार्यालयात निवेदन दिले आहे. अनेक गावात जादा भारामुळे ट्रान्सफॉर्मर जळू लागले असून दुरूस्तीला अधिक वेळ लावला जात आहे. संबंधित ठेकेदार निकृष्ठ वायंडींग करीत असल्याने ट्रान्सफॉर्मर वारंवार जळत आहेत. कांही ठिकाणी १९६0 पूर्वीच्या विद्युत वाहिन्या असून त्यातून कमी भाराने वीज मिळत आहेत. त्यामुळे उपकेंद्रेही बंद पडत आहेत. यावर तात्काळ कार्यवाही करावी, अन्यथा २५ नोव्हेंबरपासून ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात नमुद करण्यात आले आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment