पंढरपूर / शहर प्रतिनिधी
मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडचे संस्थापक-अध्यक्ष पुरूषोत्तम खेडेकर यांच्याविषयी मोबाईलच्या व्हॉटस् अँपवरून आक्षेपार्ह मजकूर टाकून मराठा समाजाच्या भावना दुखावल्याप्रकरणी ग्रुप अँडमिनसह दोघांविरूध्द तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार बुधवारी (दि.२४) दुपारी निदर्शनास आला. संदीप राजाराम ननवरे (रा. सिध्देवाडी) आणि विजय साबळे (पत्ता माहित नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. संदीप ननवरे याने व्हॉटस् अँपचा ग्रुप तयार केला असून ग्रुप अँडमिन म्हणून तो कार्यरत आहे. त्याच्या ग्रुपचा सदस्य असलेल्या विजय साबळे याने 'मावळा प्रतिष्ठान' असे नाव लिहिलेल्या त्याच्या मोबाईलवरून बुधवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास आक्षेपार्ह मजकुराची 'पोस्ट' ग्रुपवर टाकली. 'पुरूषोत्तम खेडेकर हे मुस्लीम धर्मवाढीसाठी मोहीम काढत असल्याचे' नमुद करीत आक्षेपार्ह मजकूर त्यामध्ये टाकण्यात आला आहे. सिध्देवाडी येथील तानाजी प्रकाश जाधव यांच्या मोबाईलवर हा मजकूर आल्यानंतर सायंकाळी त्यांनी तालुका पोलीस ठाण्यात येऊन मराठा समाजाच्या भावना दुखावल्याबाबतची फिर्याद दाखल केली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक दिलीप जाधव हे करीत आहेत. दरम्यान, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष किरण घाडगे, दीपक वाडदेकर, नितीन जाधव आदींसह मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकार्यांनी पोलीस निरीक्षक जाधव यांची भेट घेऊन आक्षेपार्ह पोस्ट टाकणार्या व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी केली.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment