काठमांडू : पाच दिवसीय योग प्रशिक्षण शिबीर घेण्यासाठी नेपाळला गेलेले योगगुरू रामदेव बाबा शनिवारी येथे झालेल्या शक्तिशाली भूकंपातून बालंबाल बचावले. त्यामुळे त्यांच्या लाखो अनुयायांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. आयुष्यात प्रथमच आपण अशा प्रकारची विध्वंसकारी घटना बघितल्याची प्रतिक्रिया रामदेव बाबांनी नंतर माध्यमांशी बोलताना दिली. एका भव्य मैदानावर उभारलेल्या मंडपात उपस्थितांना योगाचे धडे देत असतानाच धरणीकंप व्हायला लागला होता. या वेळी भूकंपाची शक्यता ओळखून रामदेव बाबा व त्यांचे सहकारी तत्काळ या मंडपातून बाहेर पडले. ते बाहेर पडल्यानंतर केवळ पाचच सेकंदात संपूर्ण मंडप कोसळल्याचे रामदेव बाबांनी सांगितले. भूकंपाच्या घटनेमुळे सर्वत्र हाहाकार माजला होता. आमच्या डोळय़ांसमोर दोन गगनचुंबी इमारती जमीनदोस्त झाल्याचे रामदेव म्हणाले. पाच दिवसीय योग प्रशिक्षण शिबिरासाठी रामदेव बाबा गुरुवारी नेपाळमध्ये गेले होते. मंगळवारपर्यंत हे शिबीर चालणार होते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment