0

ठिबक असेल त्यांनाच पीककर्ज

अकलूज / तालुका प्रतिनिधी
दुष्काळ, गारपीट, अवकाळी पाऊस या नैसर्गिक आपत्तींबरोबरच शेतमालाला दर नसल्याने भिकेकंगाल झालेल्या शेतकर्‍यांना आता आर्थिक मदतीची गरज असताना ज्यांच्या शेतात ठिबक त्यांनाच कर्ज, असा फतवा सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने काढला आहे. बँकेचा हा फतवा म्हणजे 'आई जेवू देईना अन् बाप भीक मागू देईना' असाच असल्याच्या प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून उमटू लागल्या आहेत. सततच्या नैसर्गिक आपत्तीने शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. अनंत अडचणीवर मात करून शेतकर्‍यांनी आपत्तीतही शेती कशीबशी जगवली आहे. सध्या विहिरी, विंधन विहिरी कोरड्या पडल्या आहेत. निरा उजवा कालव्यातून मिळालेल्या पाण्यावर शेतकर्‍यांची शेती तग धरून राहिली आहे. या शेतीतील उभ्या पिकांना खते, औषधे फवारण्यासाठी शेतकर्‍याला पैशाची गरज आहे. तसेच शेतीसाठी काढलेले कर्ज सोसायटी काढून भरण्याची गरज आहे. गेली अनेक महिने जिल्हा बँकेने कर्ज पुरवठा न केल्याने शेतकर्‍यांनी इतरांकडून पैसे घेऊन लागण, शेतीची मशागत, खते आदी कामे केली. ते पैसे परतफेड करण्यासाठी सोसायटी काढणे हा एकच पर्याय असताना जिल्हा मध्यवर्ती बँकेने ज्यांच्याकडे ठिबक सिंचन आहे, त्यांनाच कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे. शेतात सध्या ठिबक सिंचन करायचे म्हटले तर एकरी सुमारे ४0 हजार रूपये खर्च येतो. एवढा खर्च करून ठिबक सिंचन केले तर त्याला पाणीपुरवठा कोठून करणार? हा मोठा प्रश्न आहे. कारण, सध्या तालुक्यात कोणत्याच विहिरीला व विंधन विहिरीला पाणी नाही. जे काही क्षेत्र भिजले आहे ते निरा उजवा कालव्याच्या पाण्यावर भिजले आहे. या पाटाच्या पाण्यावर ठिबक सिंचन कसे करणार ? हा मोठा प्रश्न शेतकर्‍यांसमोर उभा आहे. ठिबक करण्यासाठी ४0 हजार रूपये रोख घालून बँकेकडे कर्जाचा प्रस्ताव दिल्यानंतर बँक आडसाली उसाला एकरी ४0 हजार रूपये कर्ज देते. मग कर्ज काढून पीकं जगवायची तर अगोदर पाण्याची व्यवस्था करावी लागेल अन् शेतात पाणी नाही. जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी जिल्ह्यात ज्या गावात एक एकर क्षेत्र जरी हिरवे असेल तर तेथे पाण्याचा टँकर द्यायचा नाही, हे धोरण आखले होते. ऐन उन्हाळ्यात व आताही माणसे व जनावरे पाणी-पाणी करत असतानाही त्यांनी टँकर दिला नाही. तशीच परिस्थिती जिल्हा बँकेने शेतकर्‍यांची केली आहे. या धोरणात बँकेने बदल करावा अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

Post a Comment

 
Top